
मुंबई : वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणामुळे तरुणांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नवरात्रीत राज्यात नऊ दिवसांचा ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या उपक्रमात राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांतील वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांतील विद्यार्थी यात सहभागी होतील.
संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्य, मोबाईल व सोशल मीडियाचा अतिवापर आणि व्यसनांपासून दूर राहणे या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. आजारांवर उपचार करण्याबरोबरच आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
संवादाचे विषय :
- बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य
- संतुलित आहार आणि बदललेल्या आहाराच्या सवयी
- व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती
- मानसिक आरोग्य
- मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढता स्क्रीन टाइम
- व्यसनांपासून दूर राहणे
- निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती
‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित प्रश्न तज्ज्ञांसमोर थेट मांडता येणार असून मिळणारी माहिती आरोग्यासाठी हिताची असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिली.



