ST Bus Pass Online: एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन; आगारात जाण्याची गरज नाही
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेला आता डिजिटल स्वरूप देण्यात आले आहे. चार आणि सात दिवसांच्या प्रवासासाठीचे पास आता ऑनलाइन काढता येणार आहेत. त्यामुळे पास घेण्यासाठी आगारात जाऊन रांगेत उभे आवश्यकता नाही.
एसटीच्या वाहतूक विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाइल ॲपवर ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाइन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरावी लागणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळालेला पास प्रिंट काढून किंवा मोबाइलमधील पीडीएफ स्वरूपात दाखवता येईल.
QR Code द्वारे तपासणी
ऑनलाइन पद्धतीने काढलेल्या पासवर QR कोड असणार आहे. प्रवासाच्या वेळी वाहकाच्या ईटीआयएम मशीनद्वारे हा कोड स्कॅन केला जाईल. स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार आणि त्याची वैधता यासह आवश्यक माहिती मशीनवर दिसणार आहे.
प्रवाशाने सादर केलेल्या ओळखपत्राचीही तपासणी केली जाईल. पास आणि ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतरच प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे.
आगारातील गर्दी कमी होण्यास मदत
ऑनलाइन पासमुळे आगारात जाऊन पास काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. विशेषतः सुट्टीच्या काळात आणि पर्यटनाच्या हंगामात प्रवाशांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन सुविधेची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश एसटी महामंडळाने विभागीय कार्यालये आणि आगारांना दिले आहेत.
‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ ऑनलाइन उपलब्ध झाल्यामुळे एसटीच्या पास व्यवस्थेत डिजिटल सुविधेची भर पडली असून, प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.



