Marathi Deadline: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना सरनाईकांचा सज्जड इशारा…

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित प्रवासी वाहने चालवणाऱ्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत कायद्याला स्थगिती असली तरी त्याचा गैरफायदा घेऊ नका. या कालावधीत मराठी शिकून घ्या; त्यानंतर नियमभंग खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमराठी चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करताना चालकांना सहजपणे मराठीत संवाद साधता यावा, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात १.६५ लाख चालकांना प्रशिक्षण
परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली. सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले.
मात्र, राज्यात अद्याप सुमारे ८ ते ९ लाख अमराठी चालक रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित वाहने चालवत असल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे उर्वरित चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
Online Marathi Learning चा पर्यायही
ज्या चालकांना अद्याप मराठी शिकता आलेली नाही, त्यांनी प्रशिक्षण वर्गात तातडीने नाव नोंदवावे. तसेच ऑनलाइन पद्धतीनेही व्यावहारिक मराठी शिकता येणार आहे. मर्यादित कालावधीत मोठ्या संख्येने चालकांना प्रशिक्षण देणे हे आव्हान असल्याने चालकांनी विलंब न करता या अभियानात सहभागी व्हावे, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही
व्यावहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र, ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही, हे चालकांनी लक्षात घ्यावे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
“स्थगिती ही मराठी शिकण्यापासून पळ काढण्याची संधी नाही. उलट या काळात स्वतःला तयार करण्यासाठी मिळालेली मुदत आहे. १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी करताना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल,” असा इशारा सरनाईक यांनी दिला.
प्रवासी आणि चालकांमधील संवाद सुलभ व्हावा, तसेच महाराष्ट्राची भाषा आणि सामाजिक सलोखा टिकून राहावा, हा अभियानाचा उद्देश असल्याचे परिवहन विभागाने सांगितले. त्यामुळे “आज मराठी शिका, उद्याची कारवाई टाळा”, असा संदेश देत अमराठी चालकांनी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



