Marathi Campaign;अमराठी चालकांसाठी मराठीचे धडे,दुसरा टप्पा उद्या पासून – सरनाईकांचा इशारा

ठाणे : अमराठी भाषिक व्यावसायिक चालकांना मराठी बोलता-समजता यावी, यासाठी ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाचा दुसरा टप्पा २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. निवडक केंद्रांवर २ ऑक्टोबर २०२६ ते २३ जानेवारी २०२७ दरम्यान प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.
ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात २ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता अभियानाचा शुभारंभ होईल. दैनंदिन व्यवहारातील शब्द, वाक्यरचना आणि संवाद कौशल्याचे प्रशिक्षण अमराठी चालकांना दिले जाणार आहे.
“मराठीचा आग्रह कोणाविरोधात नाही. महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या चालकांना मराठीत आत्मविश्वासाने संवाद साधता यावा हा त्यामागील उद्देश असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्यासोबतच अमराठी चालकांच्या मागणीनंतर मराठी शिकण्याची मुदत २८ ऑगस्ट २०२७पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, कायदा रद्द केलेला नसून मुदत संपल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.



