या वर्षी पितृपक्षाचा दुर्मीळ योग; १६ दिवस करता येणार श्राद्धविधी

मुंबई : हिंदू धर्मात पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावास्येपर्यंतचा कालावधी पितृपक्ष म्हणून मानला जातो. या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध तसेच ब्राह्मण भोजन आदी विधी केले जातात.
यावर्षी पितृपक्षाच्या कालावधीत दुर्मीळ योग जुळून आला आहे. तब्बल १६ दिवस श्राद्धकर्म आणि पितृविधी करता येणार आहेत. यंदाच्या पितृपक्षाची सुरुवात आणि सांगता दोन्ही शनिवारी होत असल्याने कोणत्याही तिथीचा क्षय होणार नाही. त्यामुळे पितृपक्षातील सर्व १६ दिवस धार्मिक विधी करण्याची संधी मिळणार आहे.
शनिवार, २६ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होऊन शनिवार, १० ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्येला शेवट होणार आहे. या कालावधीत कोणत्याही तिथीचा क्षय नसल्याने प्रत्येक तिथीनुसार श्राद्धविधी करता येणार असल्याचे धार्मिक जाणकारांनी सांगितले.
शनिवार हा शनीदेव आणि पितृ यांच्याशी संबंधित मानला जात असल्याने पितृपक्षाची सुरुवात आणि सांगता शनिवारी होणे हा धार्मिकदृष्ट्या विशेष योग मानला जात आहे. त्यामुळे यावर्षी पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून तर्पण व श्राद्धविधी करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



