सिवीक

गणेश विसर्जनानंतर जुहू बीचवर पुन्हा स्वच्छता अभियान; अमृता फडणवीसांसह अजय देवगणही सफाई मोहिमेत सहभागी

मुंबई : गणेश विसर्जनानंतर मुंबईतील जुहू बीचवर पुन्हा एकदा स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘दिव्याज फाउंडेशन’च्या वतीने जुहू बीचच्या ‘ए’ गेट परिसरात ‘सी शोर शाइन’ स्वच्छता अभियान २०२६चं आयोजन करण्यात आलं. या अभियानाला सलग सहाव्या वर्षी नागरिक, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्वच्छता मोहिमेत प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांनीही सहभाग घेत समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ केला. अमृता फडणवीस यांच्यासोबत अजय देवगण, बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच भाजप मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वयंसेवकांच्या नोंदणीपासून या अभियानाची सुरुवात झाली. त्यानंतर समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष सफाई मोहीम राबवण्यात आली. नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘कचरा पसरवू नका’ असा संदेश देणारी गाणी आणि अभियानाचे व्हिडिओही दाखवण्यात आले.

यावेळी समग्र आरोग्य गुरु डॉ. मिकी मेहता यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांशी आणि मान्यवरांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीसोबतच पर्यावरणाप्रती असलेल्या जबाबदारीचं महत्त्व अधोरेखित केलं.

या अभियानाला घाटकोपरचे आमदार राम कदम, मेघाश्रेच्या संस्थापिका आणि समाजसेविका सीमा सिंह, नाहर इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक व नाहर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुखराज नाहर, शिक्षणतज्ज्ञ व उद्योजक सुजय जयराज, डोम एंटरटेनमेंट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियाडवाला, मुरारका ग्रुपचे ब्रजेश मुरारका आणि असोसिएशन ऑफ सोशल बियॉन्ड बाउंड्रीजचे सागर जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण आणि शाश्वततेचा संदेश देण्यासाठी पाहुण्यांचं स्वागत पुष्पगुच्छांऐवजी हिरव्या रोपांच्या कुंड्या देऊन करण्यात आलं.

यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, समुद्र हा मुंबईची ओळख, सौंदर्य आणि आत्मा आहे. समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणं ही केवळ नागरिकांची जबाबदारी नसून आपल्या शहराप्रती असलेली भावनिक बांधिलकी आहे. ‘सी शोर शाइन’च्या माध्यमातून विशेषतः तरुणांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अभिनेता अजय देवगण यांनीही या उपक्रमाचं समर्थन केलं. स्वच्छ समुद्रकिनारे ही केवळ एखाद्या संस्था किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांच्या सामूहिक शिस्तीचं आणि जबाबदारीचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘सी शोर शाइन २०२६’ हे अभियान बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलं होतं. गणेशोत्सवानंतर समुद्रकिनाऱ्यांवर जमा होणारा कचरा, समुद्री प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासोबतच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी सातत्याने नागरिकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.

Related Articles

Back to top button