सिवीक

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५७४ पुनर्वसन सदनिकांच्या वितरणास म्हाडा कडून सुरुवात

मुंबई: बहुचर्चित वरळी बीडीडी चाळ या महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारत क्र. १ मधील विंग बी आणि सी विंग मधील एकूण ५७४ पात्र रहिवाशांना पुनर्वसन सदनिकांच्या वितरणास आजपासून वरळीतील सुमेर केंद्र इमारतीच्या म्हाडा प्रकल्प कार्यालयात सुरुवात करण्यात आली आहे

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्र. १ मधील ‘बी’ आणि ‘सी’ या विंगला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून या विंगमधील एकूण ५७४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मंडळातर्फे सुरू करण्यात आले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०६.०० वाजता आणि सार्वजनिक सुट्टी सोडून वितरण पत्र व ताबा पत्रांचे वाटप केले जाणार आहे. वितरण पत्र/ ताबा स्वीकारतेवेळी लाभार्थ्यांनी पुनर्वसन सदनिका करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकीत प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र (रु. ५००/- च्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), सदनिकाधारकांचे पासपोर्ट साईजचे ३ नविन रंगीत फोटो, पुनर्वसित सदनिकेमध्ये सोबत वास्तव्य करणा-या कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो (पोस्टकार्ड साईज) या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तीशः उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. 

निवासी सदनिकांचे वितरण विंग सी आणि बी या क्रमाने करण्यात येणार आहे.  वितरण पत्र स्किारणेबाबतचे वेळापत्रक वरील कार्यालयीन ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल. सदनिकाधारकांनी वेळापत्रकानुसार संबंधित ठिकाणी स्वतः उपस्थित राहून सदनिकेचे वितरण पत्र स्विकारावे व त्यानंतर सदनिकेचा ताबा घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. 

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे पात्र रहिवाशांना दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच पुनर्वसन इमारत क्र. १ मधील ‘एफ’, ‘जी’ व ‘एच’ विंग मधील ८२७ पुनर्वसन सदनिकांचे वितरण दि. २१ मे, २०२६ पासून सुरू करण्यात आले. ज्याप्रमाणे इमारतींचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहे त्यानुसार भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुनर्वसन सदनिकांचा ताबा दिला जात आहे.   

आशियातील नागरी पुनरुत्थानाचा सर्वात मोठा ठरलेला १९२ एकरवरील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता म्हाडा सुकाणू अभिकरण (नोडल एजन्सी) आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी, ना. म. जोशी मार्ग- परळ तसेच नायगाव येथील बी डी डी चाळींचा समावेश आहे.
          
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत १२१ जुन्या चाळींतील ९ हजार ६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एकूण भूखंडापैकी ६५ टक्के जागेचा पुनर्वसनासाठी वापर करण्यात आला आहे. १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. ४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहे. स्टील्ट + पार्ट सहा मजली पोडियम पार्किंगमध्ये प्रत्येक सदनिकाधारकास एकास एक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोडियम पार्किंगच्यावर सातव्या मजल्यावर पर्यावरण पूरक उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, ग्रेनाइट ओटा, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकचा ओट्टा,  ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक  सुविधा देण्यात आल्या असून इमारतीत अग्निरोधक यंत्रणा, तीन लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट, १ फायर लिफ्ट देण्यात आली आहे. 

 वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र व्यापारी संकुल शाळा, व्यायामशाळा, रुग्णालय, वसतिगृह आदी सुविधांचे नियोजन असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधा असणार आहेत. वरळी प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींची ‘म्हाडा’तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार असून मुंबईच्या राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार जांबोरी मैदान व आंबेडकर मैदानाचे जतन केले जाणार आहे. चाळीतील जुन्या इमारतीचे ‘जैसे थे’ जतन करुन म्हाडातर्फे संग्रहालय बनविण्यात येणार आहे. या माध्यमातून बीडीडी चाळींची माहिती व वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार असून भावी पिढीला याद्वारे बीडीडी चाळींच्या इतिहासाबाबत माहिती उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे.

Related Articles

Back to top button