राष्ट्रीय

INDIA Bloc March : SIR आणि ‘Vote Chori’च्या आरोपांवरून आज विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा

नवी दिल्ली : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) आणि कथित ‘Vote Chori’वरून विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन तीव्र केले आहे. INDIA आघाडीतील खासदार संसद भवनातील मकर द्वारापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. सकाळी १०.३० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह INDIA आघाडीतील विविध पक्षांचे खासदार या मोर्चात सहभागी होणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, मतदार याद्यांबाबतचे प्रश्न आणि SIR प्रक्रियेवर विरोधकांकडून आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.

Form 6 वरूनही वाद

SIRच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या Form 6 मधील बदलांवरूनही वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी या बदलांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप ‘misleading’ असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे Form 6 आणि SIRचा मुद्दा आता राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही SIRशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. कायद्याच्या चौकटीबाहेरचे आदेश असल्यास त्यावर न्यायालयीन हस्तक्षेप होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

AAP मोर्चात सहभागी होणार नाही

महत्त्वाचे म्हणजे आम आदमी पक्ष (AAP) आजच्या INDIA Blocच्या मोर्चात सहभागी होणार नाही. SIRच्या मुद्द्यावर पक्ष स्वतंत्रपणे आंदोलन करत असल्याचे AAPचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईनंतर दिल्लीमध्ये आंदोलन

महाराष्ट्रातही SIRच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले आहे. ४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह SIRला विरोध करण्यात आला.

दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवली

आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संसद परिसर, संसद मार्ग आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ बॅरिकेडिंग करण्यात आली असून, काही मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

SIR, मतदार यादी आणि Form 6वरील आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूक आयोग आणि विरोधकांमधील संघर्ष आता दिल्लीतील रस्त्यावर पोहोचला आहे.

Related Articles

Back to top button