इंडिगोचा विमान प्रवास महागला; इंधन शुल्कात वाढ

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीच्या इंधन शुल्कात वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधनाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
इंडिगोची ही दरवाढ ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून लागू झाली असून, त्यानंतर करण्यात येणाऱ्या नवीन बुकिंगवर वाढीव इंधन शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या काळात विमान प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात वाढ होणार आहे.
कंपनीने प्रवासाच्या अंतरानुसार इंधन शुल्काची पाच टप्प्यांत पुनर्रचना केली आहे. ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी शुल्क २७५ रुपयांवरून ३७५ रुपये, तर २,००० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी शुल्क ९५० रुपयांवरून १,३०० रुपये करण्यात आले आहे.
विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चापैकी सुमारे ३० ते ४० टक्के खर्च विमान इंधनावर होतो. त्यामुळे इंधनाच्या किमतीतील वाढीचा थेट परिणाम विमान तिकीटांच्या किमतीवर होत आहे. रेटिंग एजन्सी इक्राच्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत जागतिक पातळीवर विमान इंधनाच्या किमती उच्च पातळीवर राहिल्या आहेत.



