राष्ट्रीय

PM Modi–Eknath Shinde Meeting: ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही’; मोदी-शिंदे भेटीत दुष्काळावर तासभर चर्चा

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि शिंदे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मदत, आगामी विधान परिषद निवडणुका आणि महायुतीतील जागावाटप याबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता, दुष्काळामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या मदतीबाबत चर्चा झाल्याचे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही’

मोदी यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्राला जमेल तशी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.”

राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम मंत्र्यांनी केले आहे. केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

‘सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा’

शेतकरी संकटात असताना सरकार हात आखडता घेणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. “सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना आम्ही हात आखडता घेणार नाही,” असे ते म्हणाले.

Pune MLC Election: मंगेश चिवटेंना AB Form

दरम्यान, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. पुणे विभागाच्या जागेवर मंगेश चिवटे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांना पक्षाचा AB Form देण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप वेळ आहे. या कालावधीत महायुतीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. मात्र पुण्याच्या जागेवर मंगेश चिवटे हेच उमेदवार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींचे शिंदेंकडून कौतुक

यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था पुढे गेल्याचा दावा त्यांनी केला. “देशाचे हित प्रथम हा त्यांचा अजेंडा आहे,” असेही शिंदे म्हणाले.

ठाकरेंवरही निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांवरही शिंदे यांनी निशाणा साधला. “आरोप करणे सोपे आहे; मात्र महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना निवडणुकीत गाडून टाकले आहे, तेच आता गाडण्याची भाषा करत आहेत,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

पंतप्रधान देशाला पुढे नेत असून विकासाचे काम करत आहेत. त्यांच्याबद्दल सन्मान असला पाहिजे. मोदींबद्दल एवढी जळजळ का, असा सवालही शिंदे यांनी केला.

Related Articles

Back to top button