सिवीक

गणेश मंडळांसाठी FDA चा नियम; प्रसादाचे बिल अन् FSSAI नोंदणी आवश्यक

मनोज कुळकर्णी

मुंबई :राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अन्न सुरक्षेशी संबंधित नियम अन्न व औषध प्रशासनाकडून अधिक कडक करण्यात आले आहेत. मुंबईतील सुमारे 12,000 सार्वजनिक गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) नोंदणी करावी लागणार आहे. तसेच प्रसाद किंवा सार्वजनिक भंडारा किंवा जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची खरेदी करताना बिल आणि संबंधित विक्रेत्याची FSSAI नोंदणीची माहिती जतन करावी लागणार आहे.

यासंदर्भात FDAच्या अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रसाद आणि सामुदायिक भोजन तयार करताना कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल, याबाबत मंडळांना माहिती देण्यात आली. लहान-मोठ्या सर्व मंडळांना हे नियम लागू असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे

नियमांनुसार, प्रसादासाठी वापरले जाणारे दूध, धान्य, भाजीपाला किंवा इतर अन्नपदार्थ FSSAI नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे लागतील. या खरेदीची बिलं मंडळांना जपून ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे मंडळांनी अन्नपदार्थ खरेदी करताना विक्रेत्याची नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे तपासणं गरजेचं आहे.

या नियमांमुळे विशेषतः लहान गणेश मंडळांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक लहान मंडळे व्यावसायिक केटरर्सऐवजी स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने प्रसाद किंवा जेवण तयार करतात. त्यामुळे नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी वेळ द्यावा, अशी मागणी काही मंडळांच्या प्रतिनिधींनी केली होती. मात्र, यावर्षीपासूनच नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रसाद किंवा अन्नपदार्थ कोणी दान केले तरी त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने 50 किलो लाडू दान केले असल्यास ते कोणी दिले आणि ते कुठे तयार करण्यात आले, याची माहिती मंडळाकडे असणं आवश्यक असेल.
याच बरोबर भाजीपाला किंवा इतर वस्तुंचीं खरेदी केल्यास त्याची बिले किंवा पावती सांभाळून ठेवावी लागणार आहेत. तसेच
महिला बचत गटांकडून तयार करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांबाबतही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. अशा गटाकडून अन्न खरेदी करणाऱ्या मंडळांना गटाच्या परवान्याची प्रत, खरेदीची पावती आणि अन्नपदार्थ संबंधित गटानेच तयार केल्याचं घोषणापत्र ठेवावं लागणार आहे.

अन्न हाताळणाऱ्या स्वयंसेवकांसाठीही स्वच्छतेच्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आलं आहे. पारंपरिक पद्धतीने अन्न वाढणाऱ्या स्वयंसेवकांना काही पोशाखांबाबत सवलत देण्यात आली असली तरी टोपी, हातमोजे आणि मास्क यांसारख्या स्वच्छतेच्या उपाययोजना आवश्यक असतील. तसेच अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीकडे वैध वैद्यकीय प्रमाणपत्र असणंही गरजेचं आहे.
अन्न व औषध विभागाच्या ह्या अटी सर्वांजिक मंडळांना जाचक वाटत

आहेत.यावर सरकारने काही तोडगा काढावा नाही तर आम्हाला भंडारे किंवा सार्वजनिक भोजनाचे कार्यक्रम रद्द करावे लागतील असे मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत.

Related Articles

Back to top button