कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रकृतीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून विशेष यज्ञ…

नवी दिल्ली : विमानातील कथित हायजॅकचा प्रयत्न धाडसाने हाणून पाडणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून विशेष यज्ञाचे आयोजन करण्यात आले. दक्षिण दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलाश परिसरातील आर्य समाज मंदिर-संत नगर येथे शुक्रवारी सकाळी हा यज्ञ पार पडला.
यज्ञानंतर बोलताना विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले. गंभीर दुखापत झाल्यानंतरही त्यांनी प्रसंगावधान राखत विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केल्याचे बंसल यांनी सांगितले.
या घटनेचा संदर्भ देताना बंसल यांनी कट्टरतावादी मानसिकतेवर टीका केली आणि भारतीय संस्कृती मानवता, सुरक्षा व कल्याणाला प्राधान्य देत असल्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या धैर्याचे कौतुक केल्याचेही त्यांनी नमूद केले.
यज्ञाचे संचालन दर्शनाचार्या विमलेश आर्य यांनी केले. ही घटना ‘बुराईवर अच्छाईच्या विजयाचे’ प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. कॅप्टन मच्छार यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
या कार्यक्रमाला आर्य समाजाचे मंत्री डॉ. वरुण कुमार, कोषाध्यक्ष वीरेंद्र सूद, ट्रस्टी संजय सिकरिया, संरक्षक विजय पाल कौशिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभात रमन व टेकराज, सेवा भारतीचे प्रकाश मिश्र, कमला नेहरू कॉलेजचे प्रा. डॉ. अंकुर राज यांच्यासह स्थानिक आरडब्ल्यूए आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



