राष्ट्रीय

भारतावर ‘सुपर एल निनो’चे सावट: उष्णता, दुष्काळ आणि वणव्यांचा धोका; 188 शास्त्रज्ञांचा सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली: आगामी काळात भारतावर तीव्र स्वरूपाच्या ‘सुपर एल निनो’चे संकट घोंघावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य पर्यावरणीय आणि हवामानविषयक संकटाला तोंड देण्यासाठी शास्त्रज्ञ आणि धोरणकर्त्यांनी तातडीने तयारी सुरू करावी, असे आवाहन देशातील 188 शास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांनी केले आहे.

पर्यावरणावर काय होणार परिणाम?

एल निनोच्या प्रभावामुळे केवळ पावसावरच परिणाम होणार नसून उष्णतेची लाट, भीषण दुष्काळ, जंगलांना लागणारे वणवे आणि समुद्रातील प्रवाळभित्तींचा ऱ्हास यांसारख्या गंभीर संकटांची तीव्रता वाढू शकते. या सर्व परिणामांचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

प्रशांत महासागराचे वाढते तापमान:

प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ०.५ अंश सेल्सिअसच्या मर्यादेपेक्षा अधिक वाढले असून ऑगस्ट २०२६ मध्ये ते २.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात यात तब्बल ४ अंशांपर्यंत वाढ होण्याची भीती आहे.

वनस्पती आणि झाडांवर ताण:

पश्चिम घाटातील अनेक मोठी झाडे आधीच उष्णता सहन करण्याच्या कमाल मर्यादेवर आहेत. दुष्काळ आणि तीव्र उष्णतेमुळे या वृक्षांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच शहरांमधील ‘हीट आयलंड’ परिणामामुळे वनस्पतींवर उष्णतेचा ताण अधिक वाढेल.

उपजीविकेवर संकट:

दुष्काळ आणि उष्णतेचा थेट फटका शेतकरी, मच्छीमार आणि मेंढपाळांच्या उपजीविकेला बसण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिना ठरला विक्रमी उष्ण

जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२६ हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण ऑगस्ट महिना ठरला आहे. या कालावधीत उत्तर गोलार्धाने विक्रमी उष्ण उन्हाळा अनुभवला, तर दक्षिण गोलार्धातील हिवाळाही कमालीचा उबदार नोंदवला गेला.

यंदाचा हिवाळाही गारठ्याविना; उष्ण राहण्याचा अंदाज

२०२६-२७ मधील ‘सुपर एल निनो’च्या तीव्र प्रभावामुळे यंदाचा हिवाळा नेहमीपेक्षा अधिक उष्ण, कोरडा आणि कमी थंडीचा राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२६ पासून पुढील काही महिने भारतातील अनेक भागांत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. पावसाच्या अनियमिततेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून कोरडेपणा आणखी वाढेल. यामुळे भूजल पातळी खालावून पुढील वर्षीचा उन्हाळा अधिक तीव्र आणि दाहक ठरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button