SBI सह सरकारी बँकांचे ग्राहक सावधान! सलग ५ दिवस बँकांचे कामकाज राहणार ठप्प; काय आहे कारण?

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियासह (SBI) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये खाते असणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या आठवड्यात ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (UFBU) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. शनिवार-रविवारच्या सुट्ट्या आणि हा संप एकाच वेळी आल्यामुळे २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान सलग पाच दिवस बँकांच्या शाखांमधील कामकाज पूर्णपणे प्रभावित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांनी आपली महत्त्वाची आर्थिक कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असा अधिकृत इशारा स्टेट बँकेने जारी केला आहे.
सलग ५ दिवस बँका का बंद राहणार?
२६ सप्टेंबर (चौथा शनिवार): आरबीआयच्या (RBI) नियमांनुसार महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँकांना अधिकृत सुट्टी असते.
२७ सप्टेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टीमुळे सर्व शाखा बंद राहतील.
२८ ते ३० सप्टेंबर (देशव्यापी संप): प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
त्यामुळे शनिवार ते बुधवार या सलग पाच दिवसांत चेक क्लिअरन्स, रोख रक्कम भरणे आणि पासबुक प्रिंटिंग यांसारख्या काउंटरवरील प्रत्यक्ष सेवा ठप्प राहू शकतात.
स्टेट बँकेचा (SBI) ग्राहकांना सतर्कतेचा सल्ला
एसबीआयने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान संपाचा इशारा दिला आहे. सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रशासकीय प्रयत्न करत आहोत; मात्र, तरीही गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी आपली तातडीची व महत्त्वाची कामे संप सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करून घ्यावीत.”
कॅश आणि डिजिटल व्यवहारांसाठी काय व्यवस्था असेल?
एटीएम (ATM) आणि ADWM सुरू राहणार: पैसे काढण्यासाठी व जमा करण्यासाठी एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशिन्स (ADWM) सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, सलग सुट्ट्यांमुळे रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे आधीच आवश्यक रोख रक्कम जवळ बाळगणे योग्य ठरेल.
डिजिटल सेवा सुरळीत चालणार: शाखा बंद असल्या तरी इंटरनेट बँकिंग, ‘योनो’ (YONO) ॲप, मोबाईल बँकिंग, UPI, NEFT आणि IMPS यांसारख्या डिजिटल सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
ग्राहक सेवा केंद्रे (CSPs): ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिक मूलभूत व्यवहारांसाठी बँक ग्राहक सेवा केंद्रांची मदत घेऊ शकतात.



