राष्ट्रीय

PM Narendra Modi Full Speech : नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण; म्हणाले, ‘पद-प्रतिष्ठेपेक्षा देशसेवा मोठी’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने दिल्लीत जनतेला संबोधित करताना त्यांनी आपल्या 25 वर्षांच्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. हा संपूर्ण प्रवास जनतेच्या आशीर्वादामुळे आणि सातत्याने मिळालेल्या विश्वासामुळे शक्य झाला असल्याचं मोदी यांनी म्हटलं.आपल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, 25 वर्षांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना सार्वजनिक जीवनात असा एक टप्पा येईल, याची कल्पनाही केली नव्हती. भारतीयांचा विश्वास आणि लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या संधीमुळे सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा प्रवास पूर्ण करता आला. यासाठी त्यांनी भारतीय लोकशाही आणि संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

‘पंतप्रधान होईन असं कधी वाटलं नव्हतं’

आपल्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना मोदी यांनी सांगितलं की, पंतप्रधान होण्याची अपेक्षा त्यांनी कधीच केली नव्हती. त्यांचा राजकीय प्रवास हा प्रामुख्याने संघटनात्मक स्वरूपाचा होता. निवडणुकीच्या राजकारणात स्वतःचं नाव निर्माण करण्याची इच्छा असती तर सुरुवातीपासूनच निवडणुकीच्या मैदानात उतरलो असतो, मात्र आपला स्वभाव तसा नव्हता, असं त्यांनी सांगितलं.“माझं काय होईल, याचा विचार मी कधीच केला नाही. मी ॲम्बिशनसाठी नव्हे, तर मिशनसाठी जगणारा माणूस आहे. मला जी जबाबदारी मिळाली, ती मी निभावत गेलो,” असं मोदी म्हणाले.

‘कर्म हीच देशसेवा’

आपल्या जीवनाचं ध्येय देशाची निरंतर सेवा करणं असल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. कर्माला कर्तव्य मानून काम करत राहणं हीच आपली साधना असल्याचं त्यांनी म्हटलं.“काम थांबलं नाही पाहिजे. माझं कर्म देशासाठी आणि देशवासीयांसाठी आहे. देशाने आणि जनतेने मला संधी दिली, त्यामुळे देशाप्रती माझी जबाबदारीही तितकीच मोठी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘पद, प्रतिष्ठेपेक्षा देश मोठा’

देशासमोर सत्ता, पद किंवा प्रतिष्ठेला कोणतंही महत्त्व नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. “जेव्हा गोष्ट देशाची असते, तेव्हा पद, प्रतिष्ठा आणि अधिकार याला काहीही महत्त्व नसतं. देशासमोर सत्ता सुख काहीही मोठं नाही. पद आणि प्रतिष्ठा जगात कुठेही मिळू शकते; मात्र भारतासारखी पुण्यभूमी मिळणार नाही,” असं ते म्हणाले.गेल्या 25 वर्षांच्या प्रवासाकडे व्यक्तिगत महिमामंडण म्हणून पाहत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हा प्रवास जनतेच्या विश्वासामुळे आणि मिळालेल्या जबाबदाऱ्यांमुळे शक्य झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘माझ्यासाठी लोकच देव’

जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मोदी म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना देशाची सेवा करण्याची संधी दिली. “आज मी जे काही आहे, जिथे कुठे आहे आणि माझ्यावर जी काही जबाबदारी आहे, त्यात लोकांचं सर्वात मोठं योगदान आहे. माझ्यासाठी लोकच देव आहेत,” असं त्यांनी म्हटलं.25 वर्षांचा टप्पा पूर्ण केल्यानंतरही देशासाठी अधिक जोमाने काम करण्याची शक्ती मिळावी, यासाठी आपण प्रार्थना केल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्ष आणि एनडीएवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे आणि देशवासीयांचे त्यांनी आभार मानले.

‘सेवा हा आमचा धर्म’

देशसेवेच्या भावनेवर भर देताना मोदी यांनी बुद्धापासून स्वामी विवेकानंदांपर्यंतच्या विचारांचा उल्लेख केला. संसाधने मर्यादित असली तरी धैर्य आणि स्वप्नं मोठी असली पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं.स्वयंसेवकांकडून मिळालेल्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला. “आम्ही मानवतेचे सेवक आहोत. सेवा हा आमचा धर्म आहे. गरीब आणि गरजूंची सेवा करणं हे आमचं अविचल कर्तव्य आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

Related Articles

Back to top button