PM Modi @25: मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंत; मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाला शिंदेंचा सलाम

मुंबई : ७ ऑक्टोबर २००१ हा दिवस भारतीय राजकारणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. याच दिवशी राष्ट्रसेवक नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्या या राजकीय प्रवासाला २५ वर्षे पूर्ण होत असताना, ही वाटचाल केवळ एका नेत्याच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास नसून देशाच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रवासाचा महत्त्वपूर्ण अध्याय असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाच्या गौरवशाली वाटचालीबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आणि शिवसेनेच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“नरेंद्र मोदी यांची २५ वर्षांची वाटचाल ही सेवा, संकल्प आणि समर्पणाची यात्रा आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या अटळ संकल्पाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे १४० कोटी भारतीयांच्या आत्मविश्वासाला नवी उंची मिळाली आहे,” असे शिंदे यांनी म्हटले.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून सुरू झालेला नरेंद्र मोदी यांचा प्रवास आज देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला आहे. या प्रदीर्घ प्रवासात देशाच्या विकासाला नवी दिशा देण्याबरोबरच भारताचा जागतिक पातळीवरील प्रभाव वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
“भारताला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणारी नरेंद्र मोदी यांची आगामी वाटचाल अधिक गौरवशाली ठरो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड राष्ट्रसेवेसाठी अपार शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.



