पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस घरी येतात की पोलीस ठाण्यात जावे लागते? जाणून घ्या पडताळणीचे महत्त्वाचे नियम

नवी दिल्ली: पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो की, पोलीस पडताळणीसाठी अधिकारी घरी येतात की अर्जदाराला पोलीस ठाण्यात जावे लागते? पासपोर्ट मिळण्याच्या प्रक्रियेत पोलीस पडताळणी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, त्याची पद्धत स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते.
पासपोर्ट सेवेच्या सध्याच्या नियमांनुसार, नवीन पासपोर्ट काढताना बहुतांश प्रकरणांमध्ये ‘प्री-पोलीस व्हेरिफिकेशन’ (पासपोर्ट मिळण्यापूर्वी) केले जाते. तर पासपोर्ट रिन्यू (Re-issue) करताना अनेक प्रकरणांमध्ये पोलीस पडताळणीची आवश्यकता नसते किंवा पासपोर्ट दिल्यानंतर ‘पोस्ट-पोलीस व्हेरिफिकेशन’ केले जाते.
पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये नक्की काय तपासले जाते?
पोलीस व्हेरिफिकेशनचा मुख्य उद्देश अर्जदाराने दिलेली माहिती खरी आहे की नाही हे तपासणे हा असतो.
पत्त्याची खातरजमा: अर्जदाराचा सध्याचा पत्ता, मागील पत्ते आणि इतर आवश्यक बाबींची पडताळणी केली जाते. अर्जात साधारणपणे मागील एका वर्षातील वास्तव्याच्या पत्त्यांची माहिती देणे बंधनकारक असते.
कागदपत्रांची तपासणी: अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि गरज पडल्यास मूळ (Original) कागदपत्रे पडताळणी अधिकाऱ्याला दाखवावी लागतात.
पोलीस ठाण्यात बोलावले जाऊ शकते का?
व्हेरिफिकेशनसाठी पोलीस अधिकारी नेहमी घरीच येतील असे नाही. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या पद्धतीनुसार अर्जदाराशी फोनवरून संपर्क साधला जाऊ शकतो आणि गरजेनुसार त्याला पोलीस ठाण्यात किंवा तपास अधिकाऱ्याला भेटायला बोलावले जाऊ शकते.
तरीही, पासपोर्ट सेवेच्या केंद्रीय नियमावलीत प्रत्येक अर्जदाराने पोलीस ठाण्यात जाणे अनिवार्य असल्याचा कोणताही सरसकट नियम नाही. ही पद्धत पूर्णपणे स्थानिक पोलीस यंत्रणेवर अवलंबून असते.
पोलीस ठाण्यात जाताना कोणती कागदपत्रे सोबत ठेवावीत?
पोलिसांनी पडताळणीसाठी बोलावल्यास खालील कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे:
ओळखीचा पुरावा (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र)
पत्त्याचा पुरावा (उदा. लाईट बिल, रेशन कार्ड)
पासपोर्ट अर्जाची पावती (Application Receipt)
अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स
अर्जातील नाव, जन्मतारीख आणि पत्ता सर्व कागदपत्रांशी जुळणारा असावा. खोटी किंवा अर्धवट माहिती दिल्यास पडताळणी प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.
प्रत्येक पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी आवश्यक असते का?
प्रत्येक अर्जाची पडताळणी प्रक्रिया सारखी नसते.
नवीन अर्ज: यात बहुतांश प्रकरणांमध्ये पासपोर्ट जारी करण्यापूर्वीच (Pre-verification) पडताळणी होते.
रिईश्यु करणे : पत्ता किंवा इतर तपशील बदलला नसल्यास बऱ्याचदा पडताळणीची गरज भासत नाही किंवा पासपोर्ट मिळाल्यानंतर (Post-verification) पडताळणी होते.
तत्काळ योजना (Tatkaal): या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यास पासपोर्ट आधी दिला जातो आणि पोलीस पडताळणी नंतर केली जाते.



