राष्ट्रीय

बँक कर्मचाऱ्यांच्या संपावर मोठा दिलासा; आता थेट ‘रविवारी’ सर्व सरकारी बँका राहणार सुरू!

नवी दिल्ली: २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बँक संपामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी वित्त मंत्रालयाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी रविवार, २७ सप्टेंबर रोजी देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB) नेहमीच्या दिवशी जसे कामकाज चालते, त्याचप्रमाणे पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत.

सलग ५ दिवस कामकाज ठप्प होण्याचे टळले

बँक कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (UFBU) २८ ते ३० सप्टेंबर, २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. हा संप २६ सप्टेंबरचा (चौथा शनिवार) आणि २७ सप्टेंबरचा (रविवार) सलग दोन सुट्ट्यांच्या जोडणीला येत असल्यामुळे, बँकांचे कामकाज सलग ५ दिवस पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता होती. यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला असता.

रिझर्व्ह बँकेचीही मंजुरी

ग्राहकांच्या सुविधा आणि हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देखील २७ सप्टेंबर रोजी सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संलग्न शाखा आणि चलन तिजोऱ्या पूर्णपणे चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

जरी सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून युनियनच्या कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली जात असली, तरी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि ग्राहकांचे banking व्यवहार विनाअथक सुरू ठेवण्यासाठी रविवारच्या दिवशी बँका उघड्या ठेवण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button