राष्ट्रीय

आयआयटी मुंबईला टॉपर्सची सर्वाधिक पसंती

जेईई अॅडव्हान्सच्या टॉप-५००मध्ये १८३ विद्यार्थ्यांचा प्रवेश; सीएसईला सर्वाधिक मागणी

मुंबई,: जेईई अॅडव्हान्स २०२६ मध्ये अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांची भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईला सर्वाधिक पसंती असल्याचे समोर आले आहे. टॉप-१०० मधील तब्बल ६८, तर टॉप-५००मध्ये स्थान मिळवलेल्या १८३ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतला आहे. संयुक्त अंमलबजावणी समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली.

देशातील २३ आयआयटींपैकी जुन्या सात संस्थांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम असल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. जेईई अॅडव्हान्समध्ये टॉप-५ हजारमध्ये स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांपैकी २,४६० विद्यार्थ्यांनी या सात जुन्या आयआयटींमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, टॉप-५००मध्ये असलेल्या एकाही विद्यार्थ्याने इंदूर, मंडी, भुवनेश्वर, जोधपूर, गांधीनगर, पाटणा, धनबाद, रोपड, वाराणसी यांसह १५ आयआयटींमध्ये प्रवेश घेतलेला नाही.

सीएसईला सर्वाधिक पसंती

टॉपर्सची पहिली पसंती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (सीएसई) या शाखेला असल्याचेही दिसून आले. टॉप-५००मधील ३६५ म्हणजेच ७३ टक्के विद्यार्थ्यांनी विविध आयआयटींमध्ये सीएसईची निवड केली. यापैकी सर्वाधिक १४२ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईत कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला.

याउलट, सिव्हिल इंजिनीअरिंगला टॉपर्सकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. टॉप-५००मधील केवळ दोन विद्यार्थ्यांनी या शाखेची निवड केली. एअरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये तर टॉप-५००मधील एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. एआय अँड डेटा अॅनालिटिक्समध्ये १७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

शुभम कुमारची आयआयटी दिल्लीला पसंती

जेईई अॅडव्हान्समध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शुभम कुमारने आयआयटी दिल्लीची निवड केली आहे. टॉप-१०मध्ये असलेल्या पाच विद्यार्थ्यांनीही आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. मुलींमध्ये अव्वल ठरलेल्या आरोही देशपांडेनेही आयआयटी दिल्लीची निवड केली. तिची रँक ७७ होती.

मद्रास झोनमध्ये मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण सर्वाधिक राहिले. या झोनमधील उपलब्ध ४,७९६ जागांपैकी १,२६० जागांवर मुलींनी प्रवेश घेतला आहे.

Related Articles

Back to top button