Recruitment Scam: २४ निवडी, एकच केंद्र! सुषमा अंधारे आक्रमक

पुणे : राज्यातील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामगार आयुक्तालयाच्या निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेच्या निकालावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या भरतीत ६२ जागांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत नागपूरमधील एकाच परीक्षा केंद्राशी संबंधित २४ उमेदवारांची निवड झाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी अंधारे यांनी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असताना, अशा प्रकरणांची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाच केंद्रातून २४ उमेदवारांची निवड
अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार आयुक्तालयाच्या निरीक्षक पदाच्या ६२ जागांसाठी ३३ हजार १९३ अर्ज आले होते. त्यापैकी २३ हजार ५७४ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. निकालात नागपूरमधील ‘आयडीझेड-२, वाडी’ या परीक्षा केंद्राशी संबंधित २४ उमेदवारांची निवड झाल्याचा त्यांनी दावा केला.
या भरतीत निवड झालेल्या काही उमेदवारांचे अन्य परीक्षांमधील गुण कमी असल्याची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचेही अंधारे यांनी सांगितले. वेगवेगळ्या परीक्षांमधील गुणांमध्ये एवढी तफावत कशी, असा सवाल उपस्थित करत त्यांनी संबंधित नोंदींची तपासणी करण्याची मागणी केली.
‘केवळ आकडेवारी नव्हे, चौकशी महत्त्वाची’
पुणे हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे मोठे केंद्र असताना नागपूरमधील एका केंद्राशी संबंधित उमेदवारांची निवड चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, एका केंद्रातून अधिक उमेदवार निवडले जाणे एवढ्यावरून गैरप्रकार सिद्ध होत नाही. त्यासाठी केंद्रनिहाय परीक्षार्थी संख्या, उमेदवारांचे गुण, गुणवत्ता यादी आणि निवडीच्या अधिकृत नोंदी तपासणे आवश्यक आहे, असे अंधारे यांनी नमूद केले.
राज्यात यापूर्वीही पेपरफुटीच्या घटनांवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे १२ दिवस आंदोलन झाल्याचा उल्लेख करत अंधारे यांनी सरकारच्या परीक्षा प्रक्रियेवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाऊ नये, यासाठी भरती प्रक्रियेतील संशय दूर करून पारदर्शकता राखली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना अभय कशासाठी हाच प्रश्न उपस्थिती होतं आहे
.भरतीतील संशय दूर करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी आता जोर धरत आहे.



