Thane Politics: ‘कैसे हराया,म्हणणाऱ्या सहर शेख यांच्या वडिलांची शिंदेशिवसेनेते नियुक्ती; युनूस शेख म्हणतात, ‘प्रवेश नाही

मुंबई : एमआयएमच्या मुंब्र्यातील नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांना शिंदे शिवसेनेशी संबंधित अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, युनूस शेख यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही’
युनूस शेख म्हणाले, “मी गेल्या ४० वर्षांपासून इंटरनेट आणि केबलचा व्यवसाय करतो. अखिल भारतीय केबल सेना ही केबल व्यावसायिकांची संघटना आहे. मी या संघटनेत अनेक वर्षांपासून काम करत आहे. आता मला कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या भागातील केबल ऑपरेटरना एकत्र करून संघटना मजबूत करण्याचे काम करणार आहे.”
शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “मला शिवसेनेत प्रवेश करायचा असता, तर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे प्रवेश केला असता. ही व्यावसायिक संघटना आहे. मला केवळ संघटनेत पद देण्यात आले आहे,” असे ते म्हणाले.
आव्हाडांविरोधात निवडणूक लढवणार
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. आपल्या नियुक्तीमुळे आव्हाड यांना निवडणुकीत माझ्यामुळे फटका बसू शकतो, असा दावा त्यांनी मकेला आहे .
सहर शेख यांनी मुंब्रा हिरवे करण्याची भूमिका मांडली होती. त्यावर बोलताना युनूस शेख यांनी मुंब्रा हिरवे आणि ठाणे भगवे करण्याच्या विधानात चुकीचे काय, असा सवाल केला. शिवसेना स्वतःच्या ताकदीवर वाढत आहे. पक्षाला आपल्या प्रवेशाची गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक प्रश्न सोडवण्यावर भर
कळवा-मुंब्रा भागातील केबल ऑपरेटरच्या समस्या सोडवण्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे युनूस शेख यांनी सांगितले. विकासकामांसाठी निधी मिळवताना गरज पडल्यास शिवसेना किंवा भाजपकडेही जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युनूस शेख यांनी शिवसेना प्रवेश नाकारला असला, तरी शिंदे शिवसेनेशी संबंधित संघटनेतील नियुक्तीमुळे चर्चांना उधाण आले आहे. पक्षप्रवेश नाही, पण शिवसेनेच्या संघटनेत पद. युनूस शेख यांच्या भूमिकेमुळे मुंब्र्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.



