महाराष्ट्र

नवरात्रीत त्र्यंबकेश्वर दर्शनाला जाण्याचा विचार करताय? आधी ही बातमी वाचा; पुढील २ महिने मंदिर भाविकांसाठी बंद राहण्याची शक्यता!

नाशिक: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी भव्य सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील भाविकांचे दर्शन पुढील दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाला या संदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर आणि नवरात्रोत्सवाच्या दरम्यान हा निर्णय लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू

सिंहस्थ कुंभमेळ्याचे अधिकृत ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी त्र्यंबकेश्वर परिसरात भाविकांसाठी नवा दर्शन पथ उभारणे, अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे, कुशावर्त तीर्थासह प्राचीन मंदिरे आणि तीर्थांचा जीर्णोद्धार, नवीन घाटांची निर्मिती, फरशी बदलणे तसेच गोदावरी नदीचा प्रवाह अविरत राखणे अशी अनेक महत्त्वाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

नवा दर्शन मार्ग तयार करण्यासाठी परिसरातील जुन्या शासकीय इमारती पाडल्या जात आहेत. पितृपक्षानंतर नवरात्रीत त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. ही गर्दी वाढल्यास सुरू असलेल्या विकासकामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो आणि स्थानिक नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

कुशावर्त तीर्थानंतर आता मंदिर परिसर बंद ठेवण्याचा प्रस्ताव

ध्वजारोहणापूर्वी सर्व महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करता यावीत, यासाठी यापूर्वी कुशावर्त तीर्थ परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. आता मंदिर परिसरातील रस्ते, दर्शन रांगा आणि सुशोभीकरणाची कामे वेगाने आणि सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी मुख्य मंदिरच पुढील दोन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतला जात आहे.

Related Articles

Back to top button