मुंबई

Ekanat Shinde : कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; शिंदेंचे मोठे आश्वासन…

परभणी : राज्यावर दुष्काळाचे संकट असताना शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना मदत देताना सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी परभणीत दिली. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवण्यासोबतच कर्जाचे पुनर्गठन आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले .

परभणी शहरातील गांधी पार्क मैदानावर शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात शिंदे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवापर्व निमित्ताने शिवसेनेने सुरू केलेल्या ‘सेवा से समर्पण’ उपक्रमाची सुरुवात परभणीतून करण्यात आली.

कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांना २,५०० सायकली, महिलांना २,५०० शिलाई मशीन देण्यात आल्या. तसेच २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार सईद खान यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळात शेतकऱ्यांना आधार देणार

दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. शिवसेनेच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना शक्य ती मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.

‘सेवा से समर्पण’ उपक्रमातून राज्यभर २५ हजार सायकली आणि २५ हजार शिलाई मशीन, तसेच गरजू नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा देण्यासोबतच सामुदायिक विवाहांचे आयोजनही केले जाणार आहे.“दुष्काळाचे संकट असले तरी राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असे शिंदे यांनी ग्वाही दिली.

https://twitter.com/mieknathshinde/status/2107758971931267541?s=20

मोदींशी दुष्काळावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही शिंदे यांनी उल्लेख केला. मोदी यांनी आपल्या व्यस्त वेळेतून सुमारे एक तास चर्चेसाठी वेळ दिला. त्यातील बराच वेळ महाराष्ट्रातील दुष्काळ आणि लाडक्या बहीनींच्या संबंधित प्रश्नांवर चर्चा झाली. राज्याला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर मंत्रिमंडळातील सदस्यांनी दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना आधार देण्याचे काम सरकारने केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘शेतकरी हा केंद्रबिंदू’

शेतकरी हा सरकारच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. सध्याच्या संकटाच्या काळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

“राजकारणासाठी अनेक व्यासपीठे आहेत. मात्र संकटाच्या काळात शिवसेना ८० टक्के नव्हे, तर १०० टक्के समाजकारण करेल,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी या कठीण काळात निराश होऊ नये आणि खचून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

मोदींच्या २५ वर्षांच्या कार्याचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था पुढे गेल्याच म्हटले आहे . २०१४ नंतर देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होत असून महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘नेशन फर्स्ट’ या भूमिकेतून मोदी काम करत असल्याचे सांगत त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा मोदींचा प्रवास अधोरेखित केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button