मुंबई

BESTचा 2027-28 अर्थसंकल्प सादर; 1,317 कोटींची तूट

परिवहन विभागाला 1,518 कोटींचा तोटा; बस ताफा 10 हजारांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक आणि वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या BEST उपक्रमाचा 2027-28 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी BEST समितीसमोर सादर करण्यात आला. महाव्यवस्थापक (अतिरिक्त भार) तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प मांडला. BESTला यंदा एकूण 1,317.50 कोटी रुपयांची तूट अपेक्षित असून, बस ताफा भविष्यात 10 हजारांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

BESTला 2027-28 मध्ये 8,559.06 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्याचवेळी एकूण खर्च 9,876.56 कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चातील तफावतीमुळे 1,317.50 कोटी रुपयांची तूट राहणार आहे. भांडवली खर्चासाठी 647.79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन विभागाला 1,518 कोटींची तूट

BESTच्या परिवहन विभागाला 2027-28 मध्ये 3,551.55 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, या विभागाचा खर्च 5,070.26 कोटी रुपये राहण्याचा अंदाज असल्याने परिवहन विभागाला 1,518.71 कोटी रुपयांची तूट अपेक्षित आहे.

दुसरीकडे, BESTच्या वीज विभागातून 5,007.51 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. या विभागाचा खर्च 4,806.30 कोटी रुपये राहणार असल्याने 201.21 कोटी रुपयांचा अधिशेष अपेक्षित आहे. वीज विभागातील हा अधिशेष परिवहन विभागातील तूट भरून काढण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण

वीज वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. जुन्या ऊर्जा रोहित्रांसह सर्किट ब्रेकर्सची बदली तसेच नवीन विद्युत वितरण उपकेंद्रांची उभारणी केली जाणार आहे.

2027-28 मध्ये 15 एमव्हीए क्षमतेचे 33/11 केव्ही ऊर्जा रोहित्र आणि 150 जुने वितरण रोहित्र बदलण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर 33 केव्हीच्या 20 किमी, 11 केव्हीच्या 30 किमी आणि 1.1 केव्हीच्या 100 किमी नवीन केबल टाकण्यात येणार आहेत. 35 नवीन 11/0.415 केव्ही विद्युत वितरण उपकेंद्रे उभारण्याचेही प्रस्तावित आहे.

वीज बिघाड शोधण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली

वीजपुरवठ्यातील बिघाड लवकर शोधून पुरवठा पूर्ववत करण्यासाठी Advanced Distribution Management System (ADMS) लागू करण्यात येणार आहे. तसेच मीटर डेटा, बिलिंग-वसुली, ERP आणि 24 तास कॉल सेंटर यांचा समावेश असलेल्या IT/OT प्रकल्पावरही काम केले जाणार आहे.

BESTच्या सायबर सुरक्षेला बळ

BESTमध्ये Security Operations Centre (SOC) उभारण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्राच्या माध्यमातून नेटवर्कवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून, सायबर हल्ले आणि संभाव्य धोके वेळीच ओळखण्यास मदत होणार आहे. पुढील टप्प्यात ISO 27001 प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही प्रस्तावित आहे.

मोबाईलवरून मिळणार बसचे तिकीट

प्रवाशांसाठी डिजिटल तिकीट व्यवस्था अधिक सुलभ करण्यावरही भर देण्यात आला आहे. ONDC नेटवर्कच्या माध्यमातून QR कोड आधारित मोबाईल तिकीट सुविधा 21 एप्रिल 2026 पासून सुरू आहे.

सध्या ONE Ticket अॅपवरून BEST बसचे तिकीट घेता येते. आगामी काळात Chartr, PhonePe, Paytm, WhatsApp, RedBus, Rapido आणि Namma Yatri या प्लॅटफॉर्मवरूनही BESTचे तिकीट उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

बस ताफा 10 हजारांपर्यंत वाढवणार

सप्टेंबर 2026 अखेर BESTच्या ताफ्यात 2,834 बसेस होत्या. आगामी काळात आणखी 4,016 बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे.

केंद्राच्या PM E-DRIVE योजनेअंतर्गत 1,500 मिडी बसेस BESTला मिळणार आहेत. तसेच 200 मिडी CNG बसेससाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. भविष्यात BESTचा बस ताफा 10 हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबई दर्शनासाठी ओपन-डेक डबल डेकर

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हेरिटेज आणि Hop-On Hop-Off सेवेसाठी छतविरहित दुमजली बसेस उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या सेवेमुळे पर्यटकांना मुंबईतील ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांचा अनुभव घेता येणार आहे.

चालकांना सिम्युलेटरवर प्रशिक्षण

BEST चालकांसाठी दिंडोशी प्रशिक्षण केंद्रात बस ड्रायव्हिंग सिम्युलेटर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पावसाळ्यात वाहन चालवणे, अपघाताची शक्यता ओळखणे आणि इंधन बचत यासंदर्भातील प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे.

कार्यरत चालकांसाठी Refresher Training अधिक आधुनिक करण्याबरोबरच SaveLIFE Foundationच्या सहकार्याने सुरक्षाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जाणार आहेत.

एकूणच, BESTच्या 2027-28 अर्थसंकल्पात परिवहन विभागाची मोठी तूट, बस ताफ्याचा विस्तार, डिजिटल तिकीट व्यवस्था, वीज वितरणाचे आधुनिकीकरण, सायबर सुरक्षा आणि चालक प्रशिक्षण या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button