Drought Crisis: दुष्काळावर फडणवीसांची दिल्लीदरबारी ‘बिग डिमांड’; अमित शाहांकडून मोठ्या मदतीचे आश्वासन…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत राज्यातील दुष्काळाची स्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान आणि राज्य सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती फडणवीस यांनी शाह यांना दिली. केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
राज्यात २६५ पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाने विविध दुष्काळी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र, परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेता केंद्राकडून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी शाह यांच्या निदर्शनास आणून दिले.
NDRFच्या मदतीची मागणी
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी आणि ग्रामीण भागाला दिलासा देण्यासाठी NDRFच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा केंद्रासमोर मांडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मागण्यांबाबत अमित शाह यांनी महाराष्ट्राला आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांना दिली.
८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय पथकाचा दौरा
दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात येणार आहे. या काळात दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर राज्याच्या मदतीच्या मागणीला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे.
‘केंद्र महाराष्ट्राच्या पाठीशी’
अमित शाह यांनी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन केंद्राकडून मिळाले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येऊन गेल्या नंतर राज्याला केंद्राकडून किती मदत मिळते, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय पथकाच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.



