राष्ट्रीय

महाराष्ट्रातील चार खासदार संसदीय समित्यांचे अध्यक्ष…

नवी दिल्ली : संसदेच्या विविध खात्यांशी संबंधित स्थायी समित्यांची २०२६-२७ या वर्षासाठी पुनर्रचना करण्यात आली असून, महाराष्ट्रातील चार खासदारांची महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे खासदार मुकुल वासनिक, डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी, लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा चंदू बारणे आणि सुनील तटकरे यांचा यात समावेश आहे.

संसदीय स्थायी समित्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील खासदारांचा समावेश असतो. संबंधित मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेणे, अर्थसंकल्पीय मागण्यांची छाननी करणे, विधेयकांचा अभ्यास तसेच धोरणात्मक विषयांवर चर्चा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समित्यांवर असते.

कोणत्या समितीची कोणाकडे जबाबदारी?

मुकुल वासनिक — शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा समिती

डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी — विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल समिती

श्रीरंग आप्पा चंदू बारणे — ऊर्जा समिती

सुनील तटकरे — पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती

मुकुल वासनिक हे राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेले असले, तरी ते महाराष्ट्रातील नेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील चार खासदारांना संसदीय स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.

Related Articles

Back to top button