९,५०० तासांचे उड्डाण अन् संकटात प्रसंगावधान, १३ वर्षांचा अनुभव संकटात कामी आला; कॅप्टन स्मित मच्छार यांचे शौर्य

मुंबई :गेल्या दोन दिवसांपासून जगभरातील नागरिकांच्या मुखी ज्यांचे नाव आहे ते कॅप्टन स्मित मच्छार यांचे.दुबईहून तेल अविवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या ‘एफझेड-१०७३’ विमानातील हवाई प्रवासादरम्यान निर्माण झालेल्या गंभीर प्रसंगात प्रसंगावधान आणि धैर्य दाखवणारे मुंबईचे कॅप्टन स्मित मच्छार सध्या चर्चेत आहेत. विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक जगभरात होत आहे.मच्छार यांना व्यावसायिक विमान उड्डाणाचा १३ वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यांनी आतापर्यंत ९,५०० तासांपेक्षा अधिक विमान उड्डाण केले आहे. त्यापैकी ६,४०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव ‘पायलट इन कमांड’ म्हणून असल्याचे त्यांच्या व्यावसायिक प्रोफाइलमधून समोर आले आहे. बोईंग ७३७ विमानांच्या ताफ्यातही त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
कॅप्टन मच्छार यांनी जून २०२२मध्ये फ्लायदुबईमध्ये कॅप्टन म्हणून प्रवेश करण्यापूर्वी स्पाईसजेटमध्ये ११ वर्षांहून अधिक काळ काम केले. स्पाईसजेटमध्ये ते लाइन ट्रेनिंग कॅप्टन म्हणूनही कार्यरत होते.
मच्छार यांच्या सहकाऱ्यांनी आणि परिचितांनी त्यांच्या शांत स्वभावाचे कौतुक केले आहे. स्पाईसजेटमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या एका वरिष्ठ वैमानिकाने मच्छार हे ‘चांगली व्यक्ती’ असल्याचे सांगितले. त्यांचे बालपणीचे मित्र प्रतीक गांधी यांनीही मच्छार हे अत्यंत शांत आणि स्पष्ट विचार करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे नमूद केले.
हवाई प्रवासादरम्यान निर्माण झालेल्या संकटाच्या वेळी कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि व्यावसायिक कौशल्य यामुळे त्यांच्याबाबत देश-विदेशात चर्चा सुरू झाली आहे.



