Bungalow Politics: बनसोडेंवर सचिन अहिरांची कुरघोडी?अहिरांकडे ‘पुरंदर’, बनसोडेंना ‘सुनिती-९

मुंबई : शासकीय बंगल्यांच्या वाटपावरून मंत्रालयीन वर्तुळात नवी राजकीय चर्चा रंगली आहे. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शासकीय निवासस्थानांची अदलाबदल करण्यात आली असून, यात अहिरांची बनसोडेंवर कुरघोडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सचिन अहिर यांना मादाम कामा मार्गावरील ‘क-३ (पुरंदर)’ हा बंगला देण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना चर्चगेट येथील ‘सुनिती-९’ बंगला देण्यात आला होता. हे वाटप आता रद्द करण्यात आले आहे.
तर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना आता ‘सुनिती-९’ बंगला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ९ जुलै रोजी बनसोडे यांना ‘क-३ (पुरंदर)’ बंगला देण्यात आला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच तो बंगला रद्द करून त्यांना ‘सुनिती-९’ देण्यात आला आहे.
जुलैतील वाटप उलटले
दोन्ही पदाधिकाऱ्यांना जुलैमध्ये बंगल्यांचे वाटप झाले होते. मात्र, तीन महिन्यांच्या आतच शासनाने हे वाटप बदलले. त्यामुळे ‘पुरंदर’ बंगला अहिरांकडे आणि ‘सुनिती-९’ बनसोडेंकडे देण्यामागे नेमके काय राजकारण आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अहिर आणि बनसोडे हे दोघेही विधानमंडळातील महत्त्वाच्या घटनात्मक पदांवर आहेत. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानांच्या अदलाबदलीकडे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून पाहिले जात नसून, राजकीय वर्तुळात या बदलाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
अहिरांना ‘पुरंदर’, बनसोडेंना ‘सुनिती-९’
नव्या आदेशामुळे पूर्वी बनसोडेंना मिळालेला ‘पुरंदर’ बंगला आता सचिन अहिरांच्या ताब्यात जाणार आहे, तर अहिरांना देण्यात आलेला ‘सुनिती-९’ बंगला बनसोडेंना मिळणार आहे.
या अदलाबदलीमागील नेमके कारण शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा बदल प्रशासकीय गरजेतून झाला की त्यामागे राजकीय समीकरणे आहेत, याबाबतची चर्चा आता अधिक रंगू लागली आहे.
अवघ्या तीन महिन्यांत बंगला बदलण्याची वेळ का आली? अहिरांना ‘पुरंदर’ आणि बनसोडेंना ‘सुनिती-९’ देण्यामागे नेमके काय कारण? या प्रश्नांची उत्तरे सध्या गुलदस्त्यात आहेत.



