विशेष

Drought Ground Report: पदाची औपचारिकता बाजूला; बावनकुळे शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून जेवले

अकोला : डोळ्यांसमोर करपलेली पिकं… डोक्यावर तळपणारं ऊन… आणि मनात दुष्काळाची चिंता! अशा वातावरणात अकोल्यातील मानकी देगावच्या शिवारात मात्र आपुलकीचा एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला. दुष्काळ पाहणीसाठी आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाची औपचारिकता बाजूला ठेवत शेतकऱ्यांसोबत चक्क जमिनीवर बसून चटणी-भाकरीचा घास घेतला.

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असलेले बावनकुळे सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मानकी देगाव येथे त्यांनी शेतांची पाहणी केली. पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पाहणीदरम्यान दुपारच्या उन्हापासून बचावासाठी ते एका झाडाखाली थांबले. याचवेळी शेतकरी बांधवांनी घरून आणलेली साधी चटणी-भाकरी त्यांच्यासमोर ठेवली. बावनकुळेंनीही कोणताही औपचारिकपणा न करता शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून जेवण केले.

करपलेल्या पिकांमध्ये आपुलकीचा घास!

दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळी शासनाने केवळ मदतच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे म्हणणे ऐकावे, अशी अपेक्षा आहे. मानकी देगावच्या शिवारात बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसोबत साधेपणाने घेतलेला हा घास त्यामुळे पाहणी दौऱ्यातील लक्षवेधी क्षण ठरला.

एका बाजूला दुष्काळाची झळ आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या घरच्या चटणी-भाकरीची चव… या साध्या पंगतीतून शेतकरी आणि सरकारमधील संवादाचा एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.

Related Articles

Back to top button