भारताने इराणसोबत संबंध कायम ठेवावेत

प्रकाश आंबेडकर
मुंबई, दि. १ : भारताने इराणसोबतचे संबंध कायम ठेवावेत आणि खाडी युद्ध सुरू असेपर्यंत इस्रायलला शस्त्रविक्री करू नये, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणासह देशातील आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या महागाईवरही त्यांनी टीका केली.
महागाईवर भाष्य करताना आंबेडकर यांनी केंद्र सरकारला इशारा दिला. “महागाईमुळे लोकांच्या पोटातील आग भडकत चालली आहे. ज्या दिवशी ही आग डोक्यापर्यंत पोहोचेल, त्या दिवशी पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही,” असे ते म्हणाले. गेल्या मार्चमध्येच आपण केंद्र सरकारला देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत इशारा दिला होता, असा दावाही त्यांनी केला. सरकारने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली नाहीत तर आगामी काळात परिस्थिती बेकाबू होऊ शकते, असे आंबेडकर यांनी म्हटले.
देशाच्या आर्थिक व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करताना आंबेडकर यांनी बँकांबाबतही गंभीर दावा केला. “ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील,” असे सांगत ज्यांच्याकडे बँकेत पैसे आहेत त्यांनी ते काढून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. या दाव्याला कोणतेही स्वतंत्र आर्थिक पुरावे त्यांनी सभेत सादर केले नाहीत.
पोलिसांनाही त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहन केले. “गुलामी करणे सोडा. परिस्थिती येताना दिसत आहे. कदाचित तुम्हाला ती दिसत नसेल, पण आम्हाला ती जाणवत आहे,” असे आंबेडकर म्हणाले.
भारत-इराण संबंधांवर बोलताना भारताने परराष्ट्र धोरणात संतुलन राखून विविध देशांशी संबंध मजबूत करण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. विशेषतः इराणसोबतचे संबंध भारताच्या हिताचे असल्याचा दावा त्यांनी केला. इस्रायल आणि भारताच्या संबंधांबाबत केंद्र सरकारने राष्ट्रहिताचा विचार करून निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले.
“खाडी युद्ध सुरू असेपर्यंत भारताने इस्रायलला एकही शस्त्र विकू नये. इस्रायलला शस्त्र विकणे म्हणजे इराणविरोधातील युद्धाला अप्रत्यक्षपणे मदत करण्यासारखे आहे,” अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली. भारताने कोणत्याही दबावाखाली न जाता देशाच्या हिताला प्राधान्य देऊन परराष्ट्र धोरण ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली.
चीनचे वाढते आर्थिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊन भारताने जागतिक घडामोडींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक भूमिकेचा संदर्भ देत संघाच्या इस्रायलसोबतच्या संबंधांबाबतच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.
या जनआंदोलनात मुस्लिम धर्मगुरू मौलाना मजर अब्बास, मुस्तफा फारुख, मौलाना नुरी सय्यद, सय्यद फैजान, वंचितचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, युवा नेते सुजात आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, माजी आमदार नतिकुद्दीन खतीब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हातात तिरंगा घेऊन आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. ‘भारत इराणसोबत आहे’ अशा घोषणा देत भारताने इराणची साथ द्यावी आणि केंद्र सरकारने भारत-इराण संबंधांबाबत ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.



