Plane hijack दुबई-तेल अवीव विमानात हायजॅक अलर्ट; सौदीत आपत्कालीन लँडिंग

मुंबई : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या प्रवासी विमानात बुधवारी (३० सप्टेंबर) अचानक निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे खळबळ उडाली. विमानातून आपत्कालीन संकेत पाठवण्यात आल्यानंतर संभाव्य अपहरणाची भीती निर्माण झाली आणि इस्रायलने सुरक्षेच्या दृष्टीने लढाऊ विमानेही सज्ज केली. मात्र, प्राथमिक तपासानुसार ही घटना विमान अपहरणाची नसून वैमानिकांमधील झालेल्या वादामुळे निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
फ्लाय दुबईचे FZ1073 हे विमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळाकडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान विमानातून प्रथम ‘7700’ हा सर्वसाधारण आपत्कालीन संकेत, तर त्यानंतर ‘7500’ हा अनधिकृत हस्तक्षेप किंवा संभाव्य अपहरण दर्शवणारा संकेत प्रसारित झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे इस्रायली यंत्रणा सतर्क झाली.
या घटनेनंतर विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि ते सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. फ्लाय दुबईनेही विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. घटनेबाबत संबंधित यंत्रणांसोबत सहकार्य करून अधिक माहिती गोळा केली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये वाद आणि झटापट झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. याच परिस्थितीत आपत्कालीन संकेत प्रसारित झाल्याने अपहरणाची शक्यता निर्माण झाली. मात्र, अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत या घटनेमागील नेमके कारण आणि घटनाक्रमाबाबत अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.
सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर विमान सुरक्षित उतरल्यानंतर प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाचा संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.



