फ्लाय दुबईच्या वैमानिकावरील हल्ला दहशतवादी कृत्यच : यूएई

हल्लेखोर सहवैमानिकाचे नाव जाहीर; ओमानमध्ये उड्डाणावर बंदी असताना नियुक्ती कशी झाली, याचा तपास
मुंबई/कैरो : ‘फ्लाय दुबई’च्या विमानातील भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर ओमानी नागरिक असलेल्या सहवैमानिकाने केलेला हल्ला हा दहशतवादी कृत्य असल्याचे यूएई सरकारने शनिवारी स्पष्ट केले. हल्लेखोर सहवैमानिकाचे नाव हमाम अल-हमामी असल्याचेही यूएईने जाहीर केले आहे.
कट्टरतावादी विचारसरणीच्या संशयावरून हमामीवर ओमानमध्ये विमान उड्डाण करण्यास बंदी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला ‘ओमान एअर’मध्ये प्रशासकीय काम देण्यात आले. काही काळानंतर ‘फ्लाय दुबई’ने त्याची सहवैमानिक म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे विमान कंपनीने त्याची नियुक्ती करताना कोणती तपासणी केली होती, हा प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे.
दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेले कॅप्टन स्मित मच्छर यांची दुबईचे युवराज हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
प्रकृतीत सुधारणा
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांच्यावर उत्तम वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती यूएईतील भारतीय दूतावासाने शनिवारी दिली.
हल्ल्यामागील हेतूचा तपास
हमामीने हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला, त्याने हा हल्ला एकट्याने केला की त्यामागे कोणते व्यापक कारस्थान होते, तसेच त्याचा कोणत्याही कट्टरतावादी संघटनेशी संबंध होता का, याचा तपास सुरू आहे. हमामीचा जन्म यूएईमध्ये झाला असून, त्याची आई सीरियाची नागरिक असल्याचे समजते. त्याला ओमानचे नागरिकत्व कसे मिळाले, याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
हल्ल्याच्या दिवसापर्यंत हमामीचे इन्स्टाग्राम खाते सक्रिय असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या सोशल मीडिया खात्यावरील माहिती आणि त्याच्या पूर्वीच्या पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे.



