राष्ट्रीय

INDIA Alliance चा मोठा प्लॅन; 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगावर मोर्चा, जिल्हानिहाय ‘लोकशाही वाचवा’ आंदोलन

नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील SIR, EVM-VVPAT आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून INDIA आघाडीतील विरोधकांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशभर आंदोलन छेडण्याची घोषणा केली.

खरगे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दबावाखाली आयोग काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारांच्या अधिकारांशी संबंधित प्रश्नांवर विरोधक एकत्रितपणे लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे आरोप काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या नेत्यांनी केलेले आहेत; निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षाने या आरोपांना विरोध केला आहे.

2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान जिल्हानिहाय आंदोलन

INDIA आघाडीच्या बैठकीत 2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान देशभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ‘लोकशाही वाचवा मोर्चा’ आणि निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात विरोधी पक्षांसोबत सामान्य नागरिक, तरुण, स्वयंसेवी संस्था आणि लोकशाहीच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या संघटनांना सहभागी करून घेण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.

याशिवाय 6 ऑक्टोबरला विरोधी पक्षांचे खासदार दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच देशातील विविध भागांत पाच प्रमुख सभा घेण्याचीही योजना आखण्यात आली आहे.

मतपत्रिकेवर मतदानाची मागणी

INDIA आघाडीने आगामी निवडणुकांमध्ये EVM ऐवजी पुन्हा मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी केली आहे. तसेच SIR प्रक्रियेमुळे मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याचा विरोधकांचा दावा आहे. त्यामुळे SIRपूर्वीच्या मतदार याद्या वापरण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

मतदार यादीतील नावांची भर, वगळणे आणि दुरुस्ती यासंबंधीची संपूर्ण माहिती बूथ आणि विधानसभा पातळीवर सार्वजनिक करावी, अशीही मागणी करण्यात आली. कोणत्याही वैध मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला सूचना आणि अपीलची संधी मिळावी, अशी भूमिका आघाडीने घेतली.

‘लोकशाहीवर हल्ला’चा राहुल गांधींचा आरोप

बैठकीनंतर राहुल गांधी यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीवर हल्ला केल्याचा आरोप केला. भारतीय लोकशाही कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा मोठी नसून हा लढा एकत्रितपणे लढला जाईल, असे त्यांनी सांगितले.

तातडीने राजीनामा द्या

इंडिया आघाडी एकजूट असून भविष्यातही एकत्र राहणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये ‘वोटचोरी’ झाल्याचा आरोप त्यांनी केला. EVMमध्ये फेरफार, मशीन हॅक करणे आणि मतमोजणीत अनियमितता केल्याचा आरोप करत या सर्व प्रकाराचा फायदा भाजपला झाल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

20 पक्षांचा सहभाग

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्या माहितीनुसार, बैठकीत 20 विरोधी पक्ष सहभागी झाले. या पक्षांचे लोकसभेत 178 आणि राज्यसभेत 62 खासदार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आरजेडी, सीपीएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, झारखंड मुक्ती मोर्चा, सीपीआय-एमएल, इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (एम), एमडीएमके, व्हीसीके, आरएसपी, एआयएफबी आणि केरळ काँग्रेस (जे) या पक्षांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आम आदमी पक्ष, विजय यांचा टीव्हीके आणि डीएमके या पक्षांचा या बैठकीत सहभाग नव्हता, अशी माहिती देण्यात आली आहे.

INDIA आघाडीच्या प्रमुख मागण्या

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा.
  • मतदार यादीतील बदलांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी.
  • वैध मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी सूचना आणि अपीलची संधी द्यावी.
  • SIRपूर्वीच्या मतदार याद्यांचा वापर करावा.
  • EVM ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय पुन्हा लागू करावा.
  • प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी.
  • निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कामकाजावर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना भाजपने यापूर्वी उत्तर दिले आहे. ऑक्टोबर महिन्यात इंडिया आघाडीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खरच ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button