राष्ट्रीय

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! TRAI च्या नव्या नियमांमुळे रिचार्ज होणार स्वस्त; नियम जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान!

नवी दिल्ली: देशभरातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. ट्रायने प्रीपेड ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅनचे नवे नियम जारी केले असून, याचा थेट फायदा अशा ग्राहकांना होणार आहे ज्यांना इंटरनेट डेटाची गरज नसते किंवा ते अत्यंत कमी डेटा वापरतात.

TRAI च्या या नव्या नियमांमुळे रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) यांसारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत. आता ग्राहकांना नको असलेल्या डेटासाठी अतिरिक्त पैसे मोजण्याची गरज भासणार नाही, तसेच दरमहा एकाच ठरावीक तारखेला रिचार्ज रिन्यू करण्याची सुविधाही मिळणार आहे.

आता ‘व्हॉईस आणि एसएमएस ओन्ली’ स्वस्त प्लॅन्स देणे अनिवार्य
जर कोणतीही टेलिकॉम कंपनी ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेचा (व्हॅलिडिटी) असा प्लॅन देत असेल, ज्यामध्ये कॉलिंग, एसएमएस आणि डेटा या तिन्हींचा समावेश आहे, तर त्यांना तितक्याच कालावधीसाठी केवळ ‘व्हॉईस आणि एसएमएस ओन्ली’ (Voice & SMS Only) प्लॅन देणेही बंधनकारक असेल. या प्लॅनमध्ये मोबाईल डेटाचा समावेश नसणार, त्यामुळे त्याची किंमत रेग्युलर बंडल प्लॅनपेक्षा खूपच कमी ठेवावी लागेल. जे लोक केवळ कॉलिंगसाठी किंवा साधा (कीपॅड) फोन वापरण्यासाठी सिमकार्ड ॲक्टिव्ह ठेवतात, त्यांना आता महागडे डेटा प्लॅन्स घेण्याची गरज राहणार नाही.

दर महिन्याला एकाच तारखेला रिचार्ज रिन्यू होणार
टेलिकॉम कंपन्यांना किमान एक असा ‘व्हॉईस आणि एसएमएस ओन्ली’ प्लॅन द्यावा लागेल, जो दर महिन्याला एकाच ठरावीक तारखेला रिन्यू होईल. जर एखाद्या महिन्यात ती तारीख येत नसेल (उदा. फेब्रुवारी किंवा ३१ तारीख), तर तो प्लॅन त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपोआप रिन्यू मानला जाईल.

२८ दिवसांच्या चक्रातून मुक्ती; ३० दिवसांची निश्चित व्हॅलिडिटी
सर्वसाधारणपणे टेलिकॉम कंपन्या २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेले प्लॅन्स देतात, ज्यामुळे ग्राहकांना वर्षाच्या १२ महिन्यांत तब्बल १३ वेळा रिचार्ज करावे लागत होते. नव्या नियमांनुसार ३० दिवसांची स्पष्ट वैधता असलेल्या प्लॅन्सना प्राधान्य देण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी रिचार्जचा हिशोब ठेवणे अधिक सोपे होणार आहे.

दीर्घ व्हॅलिडिटी असलेले Voice-SMS प्लॅन्सही उपलब्ध होणार
ट्रायने केवळ मासिकच नाही, तर दीर्घ व्हॅलिडिटी (जसे की ८४ दिवस किंवा वार्षिक) असलेल्या डेटा प्लॅन्सच्या तोडीस तोड दीर्घ मुदतीचे ‘Voice आणि SMS Only’ प्लॅन्सही उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या बाजारात असे पर्याय अत्यंत मर्यादित असल्याने कमी बजेट असलेल्या ग्राहकांच्या हितासाठी ही रचना सक्तीची करण्यात आली आहे.

Jio, Airtel आणि Vi युजर्सनी काय करावे?
ग्राहकांना यासाठी कोणतीही वेगळी किंवा अतिरिक्त प्रक्रिया करण्याची गरज नाही. दूरसंचार कंपन्या लवकरच त्यांच्या ॲप्स आणि अधिकृत संकेतस्थळांवर (वेबसाइट) हे नवे स्वस्त Voice-SMS आणि ३० दिवसांचे प्लॅन्स उपलब्ध करतील. त्यामुळे यापुढे रिचार्ज करताना युजर्सनी आपल्या गरजेनुसार प्लॅनचे तपशील तपासून योग्य प्लॅनची निवड करणे फायदेशीर ठरेल.

Related Articles

Back to top button