विशेष

LPG Cylinder Update: १ ऑक्टोबरपासून ‘या’ ग्राहकांना बसणार फटका

प्रशांत गोडसे

मुंबई : देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी १ ऑक्टोबर २०२६पासून काही महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एलपीजी कनेक्शन, सब्सिडी, ई-केवायसी आणि सिलेंडर बुकिंगसंदर्भातील नियम जारी केले आहे. त्यामुळे इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅसच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

सब्सिडीसाठी Biometric e-KYC आवश्यक

रियायती दरातील १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरसाठी Biometric Aadhaar Authentication म्हणजेच बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६पर्यंत सुमारे २७.४३ कोटी सक्रिय घरगुती ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे प्रमाण सुमारे ८९.९ टक्के आहे.

ज्या ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांच्या सब्सिडीवर परिणाम होऊ शकतो. अशा ग्राहकांना रियायती दरातील १४.२ किलोचा सिलेंडर मिळण्यास अडचण येऊ शकते. उपलब्धतेनुसार त्यांना ५ किंवा १० किलोचे सिलेंडर बाजारभावाने घ्यावे लागू शकतात. बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रियायती दरातील सिलेंडरची सुविधा पुन्हा सुरू होण्याची तरतूद आहे.

दोन सिलेंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर

एलपीजी रिफिल बुकिंगसाठी दोन सिलेंडरमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवण्याचा नियम कायम आहे. हा नियम शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी समान करण्यात आला आहे. यापूर्वी ग्रामीण भागात हा कालावधी ४५ दिवसांचा होता.

PNG कनेक्शन असल्यास LPG कनेक्शनवर निर्बंध

ज्या घरांमध्ये PNG (Piped Natural Gas) कनेक्शन उपलब्ध आहे, अशा ग्राहकांना घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवण्यास किंवा त्याचा रिफिल घेण्यास निर्बंध आहेत. मार्च २०२६च्या एलपीजी नियंत्रण आदेशानुसार, पीएनजी कनेक्शन सक्रिय झाल्यानंतर संबंधित ग्राहकांनी एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अपेक्षित आहे.

सामान्यतः पीएनजी सुरू झाल्यानंतर ३० दिवसांत एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागते. काही परिस्थितीत नोटीस मिळाल्यानंतर ९० दिवसांची मुदत लागू होऊ शकते. भविष्यात पीएनजी उपलब्ध नसलेल्या भागात स्थलांतर केल्यास ट्रान्सफर व्हाउचरच्या माध्यमातून जुने एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करण्याची तरतूद आहे.

सिलेंडर डिलिव्हरीसाठी OTP आवश्यक

एलपीजी सिलेंडरच्या सुरक्षित वितरणासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येणारा OTP देण्याची प्रक्रिया कायम आहे. डिलिव्हरीच्या वेळी ग्राहकाने हा ओटीपी सांगणे आवश्यक आहे.

याशिवाय One Household, One LPG Connection या धोरणानुसार एका पत्त्यावर एकापेक्षा जास्त घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवण्यावरही निर्बंध आहेत.

ग्राहकांनी काय करावे?

इंडेन, एचपी गॅस किंवा भारत गॅसच्या अधिकृत अॅपद्वारे किंवा संबंधित गॅस वितरकाकडे जाऊन ग्राहकांनी आपली Biometric e-KYC पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासावे. ज्यांची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे, त्यांना ती पुन्हा करण्याची आवश्यकता नाही.

पीएनजी कनेक्शन उपलब्ध असलेल्या भागातील ग्राहकांनी एलपीजी कनेक्शनबाबत लागू असलेल्या नियमांची माहिती घेऊन आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, एलपीजी सब्सिडीचा गैरवापर, डुप्लिकेट कनेक्शन आणि घरगुती सिलेंडरचा अनधिकृत व्यावसायिक वापर रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपूर्वी ग्राहकांनी आपल्या एलपीजी कनेक्शनची आणि ई-केवायसीची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

Related Articles

Back to top button