हैदराबादमध्ये ७२ फूट उंच खैराताबाद गणेशाचे आज विसर्जन

हैदराबाद :गणेशोत्सव गेले दहा दिवस मुंबई महाराष्ट्रासह देशभरात उत्साहात साजरा करण्यात आलं.आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेशभक्त जड अंतःकरणाने तयारी करत आहेत. हैदराबादमध्ये आज भव्य खैराताबाद गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे.
तब्बल ७२ फूट उंचीच्या या भव्य मूर्तीच्या विसर्जनासाठी खैराताबाद परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हैदराबाद शहर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
हैदराबाद शहराचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, खैराताबाद गणेशमूर्तीच्या विसर्जनाचे आवश्यक धार्मिक विधी पूर्ण झाले आहेत. मात्र, मिरवणूक सुरू करण्यापूर्वी काही वेल्डिंगचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून, दुपारी दोन वाजेपर्यंत तलावात मूर्तीचे विसर्जन पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सुमारे दोन हजार कर्मचारी तैनात केले आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर तसेच विसर्जनस्थळी गर्दीचे नियमन आणि सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अहमदाबादमध्येही गणेश विसर्जनासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिकेने ४९ कृत्रिम तलाव आणि विसर्जन टाक्या उभारल्या आहेत. सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी सुमारे १० हजार पोलीस व होमगार्ड जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय बीएसएफची एक कंपनी आणि राज्य राखीव पोलिसांच्या तीन कंपन्यांची मदत घेण्यात आली आहे.
अहमदाबादमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक बदल आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी १६५ जलतरणपटू तैनात करण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, बॉडी-वॉर्न कॅमेरे आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून संपूर्ण मिरवणुकीवर नजर ठेवली जात आहे.
गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या उत्सवाची सांगता गणेश विसर्जनाने होत असून, देशभरात विविध ठिकाणी आज मोठ्या भक्तिभावाने विसर्जन सोहळे पार पडत आहेत.



