दोन हजारांवरील UPI व्यवहारांवर शुल्काचा मार्ग मोकळा; केंद्राचा मोठा निर्णय
मुंबई
देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट प्रणालीपैकी एक असलेल्या UPI व्यवहारांबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन हजारांपर्यंतचे UPI व्यवहार शुल्कमुक्त राहणार असून, त्यापेक्षा अधिक रकमेच्या काही व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
UPI मुळे सध्या नागरिकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवता येतात. मात्र UPI व्यवहारांची संख्या आणि रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या व्यवहारांच्या व्यवस्थापनाचा खर्च कसा भागवायचा, याबाबत चर्चा सुरू होती.
केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार दोन हजारांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. त्यामुळे रोजच्या छोट्या व्यवहारांसाठी UPI वापरणाऱ्या ग्राहकांना याचा थेट परिणाम होणार नाही.
मात्र दोन हजारांपेक्षा अधिक रकमेच्या व्यापारी व्यवहारांवर शुल्क आकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी व्यापाऱ्यांकडून MDR म्हणजेच ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ आकारण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पाच हजार किंवा दहा हजार UPI पेमेंट केले म्हणून लगेच ग्राहकाच्या खात्यातून ठराविक शुल्क आपोआप कापले जाईल, असा सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या दोन हजारांवरील प्रत्येक UPI व्यवहारावर शुल्क’ या दाव्यांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.
सरकारच्या या निर्णयाचा उद्देश लहान रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडू न देणे आणि त्याचवेळी मोठ्या व्यापारी व्यवहारांसाठी UPI व्यवस्थेच्या खर्चाची भरपाई करण्याचा पर्याय करून देणे हा आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये UPI वर तब्बल 24,162 कोटी व्यवहार झाले असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ₹314 लाख कोटी होती. त्यामुळे UPI व्यवहारांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
UPI च्या माध्यमातून देशात दररोज मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत आहेत. डिजिटल व्यवहारांना चालना देतानाच या व्यवस्थेचा वाढता खर्च भागविण्याच्या दृष्टीने केंद्राच्या निर्णयाला महत्त्व आहे.
शुल्क आकारणीमुळे दुकानदार मोठ्या रकमेचे UPI व्यवहार स्वीकारण्यास नकार देतील का, तसेच या निर्णयाचा डिजिटल व्यवहारांवर परिणाम होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



