राष्ट्रीय

Dhruv Rathee Video:मला अटक नाही, किडनॅप केलं’, भारतीय पासपोर्ट दाखवत काय म्हणाला

नवी दिल्ली : युट्यूबर ध्रुव राठी याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची रात्री सुटका करण्यात आली. त्यानंतर राठीने व्हिडिओ प्रसिद्ध करून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते, तर आपले अपहरण केले होते, असा गंभीर आरोप त्याने केला. तसेच आपण जर्मन नागरिक असल्याच्या चर्चेलाही भारतीय पासपोर्ट दाखवून उत्तर दिले आहे.

‘घरातून जबरदस्तीने बाहेर नेलं’

ध्रुव राठीने दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास तो गुरुग्राममधील घरी झोपला होता. त्यावेळी त्याच्या आईने दरवाजा उघडताच सुमारे २० जण घरात आले. काही क्षणांतच हे लोक बेडरूममध्ये शिरले आणि त्याला बाहेर घेऊन गेले, असा दावा राठीने केला आहे.या कारवाईदरम्यान आपल्याला दुखापत झाली आणि पायात चप्पल घालण्याचीही संधी मिळाली नाही, असे त्याने व्हिडिओत सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने जीपमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी आपला आणि आई-वडिलांचा फोनही ताब्यात घेतल्याचा आरोप त्याने केला आहे .

वकिलांना भेटू दिलं नाही, राठीचा दावा

पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर वकिलांना भेटण्याची विनंती केली; मात्र त्यासाठी परवानगी देण्यात आली नाही, असे राठीने म्हटले आहे. जवळपास २२ ते २३ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा दावाही त्याने केला. या संपूर्ण प्रकारावरून त्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे .
राठीने केलेल्या आरोपांबाबत पोलिसांची अधिकृत भूमिका समोर अली नाही.

भारतीय पासपोर्ट दाखवत नागरिकत्वावर स्पष्टीकरण

ध्रुव राठी जर्मन नागरिक असल्याची चर्चा होत होती. त्यावर उत्तर देताना त्याने व्हिडिओत भारतीय पासपोर्ट दाखवला. आपण भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट करत भविष्यातही भारतीय नागरिकच राहणार असल्याचे त्याने सांगितले.

CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई?

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्रुव राठीला गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील केंद्रीय विहार परिसरातून ताब्यात घेण्यात आले होतें.तो आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी तेथे आला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस सकाळी सातच्या सुमारास त्याच्या घरी पोहोचले.

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. जंतर-मंतर येथे पुन्हा आंदोलन करण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आल्याचे वृत्त आहे.

व्हिडिओच्या शेवटी ध्रुव राठीने देशासाठी आवाज उठवत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम’ या घोषणांसह त्याने आपला व्हिडिओ संपवला.

एका बाजूला पोलिसांच्या कारवाईवर अपहरणाचा गंभीर आरोप, तर दुसरीकडे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून पासपोर्ट! ध्रुव राठीच्या दाव्यांमुळे आता या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थिती केला जातं आहे . कायद्याच्या रक्षणासाठी असलेल्या यंत्रणेनेच कायद्याच्या मर्यादा ओलांडल्या का? या प्रश्नाचे उत्तर दिल्ली पोलिस देणार हे पहाणे महत्त्वाच असणार आहे.

Related Articles

Back to top button