जिथे देवीला पहिला नैवेद्य मुस्लिम कुटुंब दाखवते! ६०० वर्षे जुन्या परंपरेपासून ते केदारनाथ देखाव्यापर्यंत, दुर्गापूजेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संगम…
नवी दिल्ली: भारतीय संस्कृतीत नवरात्रोत्सव आणि दुर्गापूजा हा सण श्रद्धा आणि भक्तीचे सर्वोच्च प्रतीक मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या महाउत्सवात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. देशातील विविध राज्यांमध्ये हा सण केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचेही एक उत्तम उदाहरण ठरत आहे.
देशभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे मुस्लिम बांधव मंडप सजावटीपासून ते प्रसाद तयार करण्यापर्यंत आणि देवीला पहिला नैवेद्य अर्पण करण्यापर्यंत अत्यंत सक्रिय भूमिका बजावतात. नवरात्रीच्या काळात सर्वधर्म समभावाची साक्ष देणारी ही ठिकाणे नेमकी कोणती आहेत, ते जाणून घेऊया.
मुर्शिदाबादमधील ६०० वर्षे जुनी परंपरा: मुस्लिम कुटुंब अर्पण करते पहिला नैवेद्य
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज भागातील बहुरा गावात कोडाखाकी दुर्गापूजेचे आयोजन केले जाते. या पूजेला सुमारे ६०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गामातेला अर्पण केला जाणारा पहिला नैवेद्य एका स्थानिक मुस्लिम कुटुंबाकडून दिला जातो. मुस्लिम बहुसंख्य परिसर असूनही ही परंपरा पिढ्यानपिढ्या कोणत्याही भेदभावाविना अविरतपणे सुरू आहे. हा सलोखा स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे.
बिहार: मंडप उभारणीत बंधुभाव आणि मोठे आर्थिक योगदान
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बखरी येथील जुन्या दुर्गा मंदिरासमोर मुस्लिम डेकोरेटर मोहम्मद प्यारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती असलेला मंडप तयार केला. सुमारे ₹१३ लाख खर्च करून साकारलेल्या या भव्य मंडपासाठी मोहम्मद प्यारे यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल ₹५ लाख रुपयांचे योगदान दिले. तसेच रोहतार जिल्ह्यातील करगहर येथेही मोहम्मद इस्लाम यांच्या चमूने कोलकात्याच्या धर्तीवर भव्य पूजा मंडप उभारून कला आणि बंधुभावाचा सुंदर संदेश दिला आहे.
मऊ येथील करहा बाजारामध्ये ५० वर्षांपासून एकत्र उत्सव
उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील करहा बाजारामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव गेल्या ५० वर्षांपासून एकत्र येऊन दुर्गापूजा महोत्सवाचे आयोजन करत आहेत. अनिल कुमार भारद्वाज हे दीर्घकाळापासून या पूजा समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत, तर शादाब खान आणि नियाज अहमद यांच्यासारखे स्थानिक मुस्लिम नेते खांद्याला खांदा लावून उत्सवाच्या नियोजनात आघाडीवर असतात. ही परंपरा संपूर्ण परिसरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे एक आदर्श प्रतीक मानली जाते.



