राष्ट्रीय

Modi-Shah Target: ‘लढाई आता मोदी-शहांविरोधात’; CJP नेत्यांचा सुटकेनंतर संताप…

प्रशांत गोडसे

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) तीन नेत्यांची दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून २४ तासांनंतर सुटका झाली आहे. अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सीजेपीने आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. आता ही लढाई केवळ निवडणूक आयोगाविरोधात राहिली नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधातही असल्याचे मुख्य प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले.

शनिवारी (१० ऑक्टोबर) दिल्लीतील आंदोलनासाठी दाखल झालेल्या या तिघांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतले होते. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. रविवारी (११ ऑक्टोबर) सुटका झाल्यानंतर रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली

आंदोलनासाठी दिल्लीला पोहोचलेल्या अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले. कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा दावा सौरव दास यांनी केला.
तिघांना वेगवेगळ्या वाहनांतून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. आमचे मोबाइल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दास यांनी सांगितले. सदर काळात आमच्या मोबाइलमध्ये काही बदल करण्या आलाय काय असा संशयही दास यांनी व्यक्त केला आहे.

‘मोदी स्वतंत्र भारतातील सर्वात डरपोक पंतप्रधान’

आशुतोष रांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी हे हुकूमशहा असून, ते स्वतंत्र भारतातील सर्वात डरपोक पंतप्रधान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“१९७५ मधील आणीबाणीबद्दल आम्ही आमच्या आई-वडिलांकडून ऐकले होते. मात्र, काल आम्ही ती परिस्थिती अनुभवली,” असे रांका म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाविरोधात सुरू केलेली लढाई आता मोदी-शहांविरोधात वळल्याचेही त्यांनी संकेत दिले आहे.‘राजा की जान तोते में है’ हे आता स्पष्ट झाल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

‘निवडणूक आयोग भाजपला जिंकवण्यासाठी काम करतोय’

निवडणूक आयोग केवळ भाजपला निवडणुका जिंकून देण्यासाठी काम करत असल्याचा आरोपही रांका यांनी केला. विमानात घुसून आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करत त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.

अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्याची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी संवेदनशीलता दाखवली नाही, असा आरोप रांका यांनी केला. दीपके यांना त्यांच्या गावातील भावाशी फोनवर बोलण्याची विनंती करूनही पोलिसांनी प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

लढाई सुरू झाली आहे; तिला युद्ध बनवू नका’

अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते हिंगोलीला रवाना झाले आहेत. दरम्यान, रांका आणि दास यांनी आंदोलन मागे घेण्याचे संकेत न देता पुढील संघर्षाची भूमिका मांडली.

“ही लढाई आता सुरू झाली आहे. मात्र, या लढाईचे युद्धात रूपांतर करण्याची वेळ आणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,” असा इशारा रांका यांनी दिला

एकीकडे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून वाद निर्माण झाला आहे. आता सीजेपी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा काय ठरवते आणि या आरोपांवर केंद्र सरकार व निवडणूक आयोग काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button