राष्ट्रीय

CJP Update: अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची जामिनावर सुटका; आता आंदोलनाची पुढील दिशा काय?

प्रशांत गोडसे

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) तीन नेत्यांची सुटका झाली आहे. अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी जामिनावर सोडले आहे . तिघांची हमीपत्रावर सुटका झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, जामिनासाठी कोणत्या अटी घालण्यात आल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुटकेनंतर आंदोलनात सहभागी होणार?

दिल्ली पोलिसांनी रविवारी (११ ऑक्टोबर) सकाळी तिन्ही नेत्यांना दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. सुनावणीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. शनिवारी आंदोलनासाठी दिल्लीमध्ये पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

आता सुटकेनंतर हे तिन्ही नेते जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होणार का, तसेच माध्यमांशी संवाद साधणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपीची पुढील भूमिका काय असेल, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

आजीच्या निधनानंतर दिपके महाराष्ट्रात परतणार?

अभिजीत दिपके यांच्या आजीचे हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथे निधन झाले आहे. त्यामुळे दिपके महाराष्ट्रात परतणार का, याविषयी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, सीजेपीने आजही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. आंदोलनासाठी परवानगी आणि त्यावरील निर्बंध याबाबतही उत्सुकता आहे.

तिन्ही नेत्यांची सुटका झाली असली, तरी आंदोलनाचा लढा संपलेला नाही. आता अभिजीत दिपके पुन्हा मैदानात उतरणार का आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी कोणती रणनीती आखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button