मनोरंजन

Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीस यांचं नवरात्रासाठी खास गाणं; Don’t stop – Maari Mahisagar सोशल मीडियावर चर्चेत…

मुंबई : गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता सर्वत्र नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. देवीच्या आगमनासाठी घराघरात आणि मंडपांमध्ये जय्यत तयारी केली जात असून, गरबा आणि दांडियासाठीही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अनेक नवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यंदाच्या नवरात्रीसाठीही एक खास गाणं चर्चेत आलं आहे. अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी नवरात्रोत्सवानिमित्त नवीन गाणं सादर केलं असून, ‘मारी महिसागर’ ( Don’t stop – Maari Mahisagar ) असं या गाण्याचं नाव आहे.

‘मारी महिसागर’मध्ये अमृता फडणवीस यांचा खास अंदाज

‘मारी महिसागर’ हे गुजराती गाणं असून त्यामध्ये गुजराती आणि हिंदी भाषेतील बोल ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे या गाण्यात अमृता फडणवीस यांनी स्वतः गाणं गाण्यासोबतच नृत्यही केलं आहे. गाण्यात त्यांच्या डान्सचा आणि लूकचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.हे गाणं अमृता फडणवीस यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगली आहे. गरबा आणि दांडियासाठी नवीन गाण्यांच्या शोधात असलेल्या चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणंही स्थान मिळवताना दिसत आहे.

शक्ती हसिजा यांचं लेखन आणि दिग्दर्शन

‘मारी महिसागर’ या गाण्याचं लेखन आणि दिग्दर्शन शक्ती हसिजा यांनी केलं आहे. गाण्यात अमृता फडणवीस खास डान्स स्टेप्स करताना दिसत असून, नवरात्राच्या उत्साहाला साजेसं असं या गाण्याचं सादरीकरण करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी मराठी, हिंदी, बंजारा, पंजाबी आणि संस्कृत अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आता गुजराती भाषेतील ‘मारी महिसागर’ या गाण्याच्या माध्यमातून त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.या गाण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, आजवर अनेक नवरात्रोत्सवांच्या कार्यक्रमांसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, स्वतः गरबा खेळण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती.

त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने ही संधी मिळाल्याने त्या खूप उत्सुक होत्या.गाण्याच्या शूटिंगपूर्वी दुर्गामातेचा आशीर्वाद घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी आपल्याला वेगळीच ऊर्जा जाणवल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच ‘मारी महिसागर’ हे गाणं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे यंदाच्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये हे गाणं किती लोकप्रिय ठरतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Related Articles

Back to top button