मनोरंजन

Dashami Marathi Movie Trailer : अन्यायाविरुद्ध कोण उभं राहणार? ‘दशमी’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; 23 ऑक्टोबरला चित्रपटगृहात

मुंबई : अन्याय कितीही मोठा असला तरी त्याच्याविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य त्याहून मोठं असतं. याच विचाराला केंद्रस्थानी ठेवत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सस्पेन्स, क्राईम, थरार आणि सामाजिक वास्तव यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ येत्या 23 ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला, तर देवी दुर्गेने महिषासुराचा संहार केला. मात्र, आजच्या काळातील अन्यायाविरुद्ध कोण उभं राहणार? याच प्रश्नाभोवती ‘दशमी’ची कथा फिरताना दिसते. ट्रेलरमध्ये रहस्य, वाढता तणाव आणि अनपेक्षित घटनांची झलक पाहायला मिळते.

रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांचा खेळ

‘दशमी’ची कथा रहस्याच्या अनेक स्तरांनी विणलेली असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. कथानकातील प्रत्येक धागा प्रेक्षकांना वेगवेगळ्या दिशेने घेऊन जातो. नवे प्रश्न, अनपेक्षित वळणं, वाढता तणाव आणि धक्कादायक खुलासे यामुळे पुढे नेमकं काय घडणार, याचा अंदाज बांधणं कठीण होणार आहे.चित्रपटाच्या नावामागेही एक वेगळी संकल्पना आहे. प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी ‘दशमी’, हा विचार चित्रपटाच्या कथेत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे हा केवळ सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर नसून सामाजिक वास्तवाला भिडणारा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे.

मुलींच्या निर्भयतेचा संदेश

‘दशमी’च्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासोबतच मुलींच्या सुरक्षितता आणि हक्कांचा मुद्दाही मांडण्यात आला आहे. प्रत्येक मुलीने निर्भयपणे जगावं आणि तिच्या हक्कांसाठी समाजानेही ठामपणे उभं राहावं, हा संदेश चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.दिग्दर्शक योगेश भोसले यांच्या मते, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद देणारा विचार या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे थरारक कथानकासोबतच सामाजिक आशयही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

दमदार कलाकारांची फौज

‘दशमी’मध्ये महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर आणि राज कुंदन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता रवि प्रकाशदेखील चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.भव्य दृश्यरचना, दर्जेदार तांत्रिक बाजू आणि मोठ्या पडद्याला साजेसं सादरीकरण हे चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. प्रत्येक फ्रेम बारकाईने साकारत मराठी सिनेमातील सस्पेन्स-क्राईम थ्रिलरला वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता ट्रेलरनंतर ‘दशमी’ चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Back to top button