Who Is Drishyam’s Sameer Deshmukh : ‘दृश्यम’मधील तब्बूचा ऑनस्क्रीन मुलगा ‘सॅम’ आता कुठे आहे? ऋषभ चड्ढा सध्या काय करतोय?

पंकज राणे
मुंबई : अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाची कथा आठवली की विजय साळगावकर, त्याचं कुटुंब आणि पोलिसांची चौकशी यासोबतच ‘सॅम’ म्हणजेच समीर देशमुख हे पात्रही नक्की आठवतं. चित्रपटातील हे पात्र फार काळ पडद्यावर दिसत नसलं, तरी संपूर्ण कथानकाला कलाटणी देण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. सॅमच्या मृत्यूनंतरच विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सत्य लपवण्याचा प्रयत्न करतो.‘दृश्यम’ फ्रँचायजीचा तिसरा आणि शेवटचा भाग ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पहिल्या भागातील सॅमची भूमिका साकारणारा अभिनेता ऋषभ चड्ढा चर्चेत आला आहे. मात्र, ऋषभ सध्या चित्रपटांमध्ये फारसा दिसत नाही. त्यामुळे तो आता नेमका कुठे आहे आणि काय करतोय, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.( Where is drishyam Sam )

‘दृश्यम’पूर्वीही ऋषभने केलंय काम
ऋषभ चड्ढाने २००७ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांसोबतच त्याने टेलिव्हिजन आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘दृश्यम’पूर्वी तो ‘खूबसूरत’ आणि ‘लुक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता.याशिवाय ‘बेस्ट ऑफ लक निकी’, ‘द सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर’ आणि ‘आदत से मजबूर’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही ऋषभने भूमिका साकारल्या आहेत. त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं असून ‘डिवोर्स के लिए कुछ भी करेगा’मध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
‘दृश्यम’मधील सॅमच्या भूमिकेने मिळाली ओळख
ऋषभला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटातील सॅमच्या भूमिकेमुळे. चित्रपटात त्याची भूमिका तुलनेने छोटी होती. मात्र, कथानकाच्या दृष्टीने सॅम हे अत्यंत महत्त्वाचं पात्र होतं.सॅमच्या मृत्यूनंतर विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पोलिसांपासून सत्य लपवण्याची धडपड करतो. त्यामुळे ऋषभने साकारलेलं हे पात्र कथेत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरतं.
ऋषभ सध्या काय करतोय?
‘दृश्यम’नंतर ऋषभ काही प्रोजेक्ट्समध्ये दिसला. मात्र, गेल्या काही काळापासून त्याने चित्रपटांपासून अंतर घेतल्याचं दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन वर्षांपासून त्याने कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलेला नाही.मात्र अभिनयापासून दूर असतानाही ऋषभ मनोरंजन क्षेत्राशी जोडलेला आहे. सध्या तो लाइव्ह स्टोरीटेलिंग, शायरी आणि कवितांच्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांशी थेट संवाद साधत आहे. त्याचा ‘मॉडर्न मजनू’ हा लाइव्ह शोही चर्चेत आहे.त्यामुळे ‘दृश्यम’मधील सॅम आज मोठ्या पडद्यावर दिसत नसला, तरी त्याने मनोरंजनाची वेगळी वाट निवडली आहे. ‘दृश्यम : द कन्क्लुजन’च्या निमित्ताने ऋषभ चड्ढाने साकारलेलं सॅमचं पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आठवणीत आलं आहे.



