सीएसएमटीवरील ७५ दिवसांच्या ब्लॉकमध्ये प्रवाशांना दिलासा

दादरपर्यंत मर्यादित केलेल्या तीन एक्स्प्रेस आता पुन्हा सीएसएमटीपर्यंत धावणार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)च्या पुनर्विकासाच्या कामासाठी सुरू असलेल्या ७५ दिवसांच्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकदरम्यान दादरपर्यंतच धावणाऱ्या तीन एक्स्प्रेसची सेवा आता सीएसएमटीपर्यंत पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे विकास प्राधिकरणामार्फत (आरएलडीए) प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेबलिंग लाइन १५ वर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या कामासाठी १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२६ या ७५ दिवसांच्या कालावधीत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.
या काळात अमरावती–सीएसएमटी एक्स्प्रेस (१२११२), लातूर–सीएसएमटी एक्स्प्रेस (२२१०८) आणि बीदर–सीएसएमटी एक्स्प्रेस (२२१४४) या तीन गाड्यांची सेवा यापूर्वी दादरपर्यंत मर्यादित करण्यात आली होती. मात्र, आता या गाड्या पुन्हा सीएसएमटीपर्यंत चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ उपलब्ध होईपर्यंत ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी येथे येणाऱ्या संबंधित गाड्यांना उपलब्धतेनुसार इतर योग्य प्लॅटफॉर्मवर वळविण्यात येणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे मध्य रेल्वेने आवाहन केले आहे.



