आरोग्य

महागड्या उपचारांपूर्वी पालिका रुग्णालयांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष द्या!

मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उणीव औषधांचा अपुरा पुरवठा आणि विविध उपचारांसाठी रुग्णांना करावी लागणारी प्रतीक्षा यांसारखे मूलभूत प्रश्न कायम असताना महागड्या उपचार सुविधांवर मोठा खर्च करण्यापूर्वी प्रशासनाने सर्वंकष नियोजन करावे, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य अशरफ आझमी यांनी केली.

कॅन्सर उपचारासंदर्भातील एका प्रस्तावावर चर्चा करताना आझमी यांनी प्रति रुग्ण होणारा खर्च, मर्यादित रुग्णांसाठी होणारा मोठा खर्च आणि भविष्यात ही सुविधा सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केले. या उपचारांसाठी आयुष्मान किंवा अन्य शासकीय योजनांमधून आर्थिक मदत मिळणार का, याबाबतही स्पष्टता असावी, असे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधे आणि मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का, याचा आधी विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. नवीन आणि महागड्या तंत्रज्ञानाचा विरोध नसून, कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास, दीर्घकालीन खर्च आणि भविष्यातील उपचार व्यवस्था निश्चित करणे आवश्यक असल्याचे आझमी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही सदस्यांनी उपस्थित केलेले आरोग्य व्यवस्थेतील प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर असले तरी त्यांना टिकवून ठेवणे मोठे आव्हान बनले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत अनुभवी डॉक्टरांची अपेक्षा अधिक असल्याने अनेक डॉक्टर महापालिकेच्या सेवेत टिकत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

मुंबईतील महापालिका आरोग्य व्यवस्थेचा एकत्रित आढावा घेऊन स्थायी समितीसमोर स्वतंत्र सादरीकरण करण्यात यावे, अशी सूचना शिंदे यांनी केली. महापालिकेकडे किती रुग्णालये, खाटा आणि आयसीयू सुविधा आहेत, डॉक्टर व मनुष्यबळाची स्थिती काय आहे आणि भविष्यातील पाच वर्षांसाठी कोणते नियोजन आवश्यक आहे, यावर सविस्तर चर्चा व्हावी, असे त्यांनी सांगितले.

Back to top button