Two Whatsapp On One Phone: एकाच फोनमध्ये चालणार दोन व्हॉट्सॲप! कोणत्याही क्लोन ॲपशिवाय करा ॲक्टिव्हेट, जाणून घ्या सोपी पद्धत…
मुंबई: आजच्या काळात बहुतांश लोक वैयक्तिक जीवन आणि कार्यालयीन कामासाठी दोन स्वतंत्र मोबाईल नंबर वापरतात. यापूर्वी एकाच स्मार्टफोनमध्ये दोन व्हॉट्सॲप खाती चालवण्यासाठी वापरकर्त्यांना ड्युअल ॲप्स, ॲप क्लोनर किंवा व्हॉट्सॲप बिझनेसचा आधार घ्यावा लागत होता. परंतु, आता कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय तुम्ही एकाच फोनमध्ये अधिकृतपणे दोन स्वतंत्र व्हॉट्सॲप खाती सहज चालवू शकता.
व्हॉट्सॲपच्या अधिकृत इन-बिल्ट मल्टिपल अकाउंट्स या फीचरच्या मदतीने एकाच ॲपमध्ये दोन वेगळे नंबर्स वापरणे शक्य झाले आहे. या सुविधेमुळे दोन्ही खात्यांचे मेसेज, कॉल्स आणि नोटिफिकेशन्स एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे राहतात. इन्स्टाग्राम किंवा फेसबुकप्रमाणेच वापरकर्ते अवघ्या एका क्लिकवर एका खात्यातून दुसऱ्या खात्यात स्विच करू शकतात.
दुसऱ्या व्हॉट्सॲप खात्यासाठी काय आवश्यक आहे?
तुमचा दुसरा सक्रिय मोबाईल नंबर, जो त्याच फोनमध्ये ड्युअल सिम किंवा ई-सिम म्हणून असू शकतो, किंवा ओटीपी पडताळणीसाठी दुसऱ्या कोणत्याही साध्या फोनमध्ये असला तरी चालेल. तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲपची सर्वात अद्ययावत आवृत्ती असणे आवश्यक आहे.
एकाच फोनमध्ये दुसरे खाते जोडण्याची पद्धत:
१. स्मार्टफोनमधील मुख्य WhatsApp सुरू करा.
२. स्क्रीनवर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर टॅप करून Settings मध्ये जा.
३. Settings मध्ये प्रोफाईल नावाच्या आणि क्यूआर कोडच्या बाजूला असलेल्या छोट्या ॲरोवर (बाणाच्या चिन्हावर) क्लिक करा.
४. खाली एक पॉप-अप विंडो उघडेल, त्यातील + Add Account हा पर्याय निवडा.
५. स्क्रीनवर दिसणाऱ्या अटी मान्य करून Agree and Continue वर टॅप करा.
६. आता तुमचा दुसरा मोबाईल नंबर नोंदवा आणि Next करा.
७. त्या नंबरवर आलेला ६ आकडी ओटीपी नोंदवून पडताळणी पूर्ण करा.
८. प्रोफाईल नाव आणि फोटो सेट करताच तुमचे दुसरे व्हॉट्सॲप खाते त्याच ॲपमध्ये सक्रिय होईल.
खाती कशी बदलायची?
जेव्हा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात जायचे असेल, तेव्हा होम स्क्रीनवरील वरील तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
तेथे सर्वात शेवटी असलेल्या Switch Accounts या पर्यायावर टॅप करताच काही सेकंदांत तुमचे दुसरे खाते उघडेल.
तुम्ही एका खात्यावर कार्यरत असतानाही दुसऱ्या खात्यावरील मेसेजचे नोटिफिकेशन्स नेहमीप्रमाणे स्क्रीनवर मिळतील.



