विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचे प्रमुख काम पूर्ण

ध्वनीरोधक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात; १० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी सज्ज
घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणाऱ्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील मुख्य उड्डाणपुलाचे प्रमुख काम पूर्ण झाले आहे. केवळ ध्वनीरोधक (Noise Barrier) बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पस्थळाची पाहणी केली. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

हा दोन मार्गिकांचा उड्डाणपूल ६५० मीटर लांबीचा आहे. त्यामध्ये रेल्वे रुळांवरील १०० मीटर लांबीचा पूल, पूर्वेकडील २२० मीटर आणि पश्चिमेकडील ३३० मीटर लांबीचे पोहोच मार्गांचा समावेश आहे. उड्डाणपुलावरून विद्याविहार स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्गाची सुविधाही करण्यात आली आहे.
याशिवाय दोन्ही बाजूंचील रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय आणि जिन्यांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याद्वारे पादचारी मार्ग उपरस्त्याला जोडण्यात आला आहे.
उड्डाणपुलावरील रंगकाम, दिवाबत्ती व्यवस्था, रस्ता आणि अन्य अंतिम कामे पूर्ण झाली आहेत. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ध्वनीरोधक बसविण्याचे काम मात्र अंतिम टप्प्यात आहे.
उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रमुख जंक्शन, सिग्नल, वाहनांची वर्दळ आणि पादचारी सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि गरजेनुसार वाहतूक नियमनाची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पाहणीवेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.



