मुंबई

राष्ट्रीय ‘सुपर ६०’मध्ये निवड झालेल्या महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मुंबई : बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्रातून सहभाग नोंदविलेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’ मध्ये स्थान मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांमधील श्रद्धा रमेश लोंढे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासह विशेष सुवर्णपदक पटकाविले असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी श्रद्धासह सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि समाजोपयोगी नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी १२ वी राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये झाली. महाराष्ट्रातील २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांतील ३५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत विज्ञानाधारित प्रकल्प सादर केले. देशभरातील सुमारे ८०० विद्यार्थी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रकल्पांचे नावीन्य, सामाजिक उपयुक्तता, वापरण्यातील सुलभता आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोगिता या निकषांवर उत्कृष्ट ६० प्रकल्पांची ‘सुपर ६०’ गटासाठी निवड झाली. या गटात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल, चांदगावची विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने ‘एआय बेस्ड टीचर असिस्टंट फॉर ब्लाइंड्स’ या प्रोटोटाइपसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विशेष सुवर्णपदक पटकावले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना सहाय्य करण्याच्या संकल्पनेवर हा प्रकल्प आधारित आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले.

‘सुपर ६०’मध्ये श्रद्धा लोंढे हिच्यासह सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद स्कूल, लक्ष्मीवाडीचा राजवर्धन प्रदीप काळे; पुण्यातील एम. ई. एस. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची देविका सुहास ताड; पुण्याच्या सिटी प्राइड स्कूलचा अर्णव भुसारी; डी. ई. एस. माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची गीता गणपत धनवडे; सोलापूर जिल्ह्यातील के. एल. ई. मंगरुळे हायस्कूल, अक्कलकोटची शांभवी रामनप्पा अजगुंडे आणि वाशिम येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विराज संदीप शिंदे यांची निवड झाली आहे. या सातही विद्यार्थ्यांना जितेंद्र सिंह यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसह मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि संबंधित शाळांचेही मोलाचे योगदान आहे.

राज्य शासनाने विद्यार्थी विज्ञान वारी या उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञान क्षेत्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून ‘नासा’ ला भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाद्वारे राज्य शासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नमूद केले आहे.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरण मार्फत राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत सुपर ६० मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना साकुरा विज्ञान विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत जपान भेटीची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.

Related Articles

Back to top button