विद्याविहार उड्डाणपुलाला ‘पद्मश्री नाना पाटेकर सेतू’ नाव देण्याची शिवसेना उबाठा गटाच्या विभाग प्रमुखाची मागणी

मुंबई : विद्याविहार पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे स्थानकाजवळील नव्या उड्डाणपुलाला ‘पद्मश्री नाना पाटेकर सेतू’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदन सादर केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि समाजसेवक नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’ आणि ‘परिंदा’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
अभिनयासोबतच नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील समस्यांसाठीही योगदान दिले आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शेतकरी मदत, जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी काम केले आहे.
नाना पाटेकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान आणि सामाजिक कार्याचा गौरव व्हावा, तसेच त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विद्याविहार येथील नव्या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



